- मृत्यू शय्येवर असलेला दिवाकर वासंतीला काहीतरी खुणावत होता. ती पार गोंधळून गेली होती. घाबरतच ती दिवाकर च्या जवळ गेली. दिवाकर वासंतीला म्हणाला तू खूप नशीबवान आहेस कारण माझ्या मृत्यूनंतर तूझी आणी मुलांची जबाबदारी रेणुका ने घेतलीय. रेणुका ने तुम्हाला जणू दत्तकच घेतलंय. वासंती :रेणुका कोण रेणुका?
ती तिथे उभी आहे ती, दरवाजा जवळ खुणावत दिवाकर म्हणाला.
वासंतीने मागे वळून पाहिले, इतक्यात दिवाकर जोरजोराने श्वास घ्यायला लागला. त्याच्या हृदयाचे ठोके कमी व्हायला लागले.जवळच असलेल्या डॉक्टर ने काही इंजेक्शन दिले. ऑक्सिजन वगैरे चालूच होते. पण सगळे प्रयत्न करूनही, दिवाकर विसावला तो कायमचा.
रेणुका:वासंती येऊ का घरात?
आज दिवाकर जाऊन बरोबर तेरा दिवस झाले होते. वासंती च्या मनात खूप सारे प्रश्न होते, कोन ही रेणुका आणी आपली का मदत करणार आहे. म्हणजेच वासंतीला काही उपकार वगैरे नको होते पण दिवाकरने काढलेले घराचे कर्ज आणी वासंती स्वतः गृहिणी होती. तीने आतापर्यंत एकही काम बाहेरचे केले नव्हते.
वासंती: कोन आहेस तू? दिवाकर ने मला तुझ्याबद्दल कधीच काही सांगितले नाही. आणी तू आताच कशी काय आलीस? रेणुका: सांगते सांगते सर्व सांगते फक्त मला एवढं वचन दे की, अर्धवट ऐकून कुठल्याही निर्णयावर पोहोचायचे नाही. आधी पूर्ण ऐकून घे आणी मगच तू ठरव आपण सोबत राहायचे की नाही राहायचे ते. तर ऐक मग
मी आणी दिवाकर कॉलेज मध्ये अकरावीत असताना भेटलो. आमचा कॉलेजचा अगदीच पहिला दिवस, माझ्या वडिलांनी मला लुना घेऊन दिलेली, मी कुर्ता पैजामा आणी ओढणी असा पोशाख घातलेला होता. कॉलेज जवळ गेले आणी अचानक माझी ओढणी ओढल्याचा भास झाला.मी लागलीच लुना थांबवली पाहते तर माझी ओढणी लुनाच्या मागच्या चाकात अडकली होती.मी डोक्यावर हात मारला.लुना स्टॅन्ड वर उभी केली आणी ओढणी ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागले. "May i help you" बाजूने एक आवाज आला.मी डोके वर केले तर देखणा, रुबाबदार आणी नीट नेटका दिवाकर मला विचारत होता. पण मी ठरले अखडू, मी म्हणाले "no thanks"लुनाचं चाक उलट्या दिशेने फिरवा दिवाकर रागाने म्हणाला, आणी तिथून निघून गेला. मी चाक उलटे फिरवले आणी सहजच ओढणी निघाली.मला आता माझ्या वागण्याचा पश्चाताप होत होता.वाटलं उगाचच अखडू पणा केला आपण त्याने आपली मदतच केली ना, आपण सॉरी म्हणू पण इतक्या मोठ्या कॉलेज मध्ये त्याला शोधणार कसे?
पण नशिबाने तो माझ्याच वर्गात होता. एकदम समोरच्या बाकावर बसलेला होता. मैत्रिणींकडून कळाले की तो खूप हुशार होता. दहावीला गुणवत्ता यादीत आलेला होता. मग recess मध्ये मी त्याला भेटून उद्धटपणे बोलल्याची क्षमा मागितली. आणी उपाय सुचवला म्हणून thanks ही म्हणाले.
नंतर आमची चांगली मैत्री झाली नोट्स, परीक्षा पेपर्स ची देवाण घेवाण करायचो, सोबत अभ्यास ही करायचो. व कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हे आम्हालाही कळलं नाही. आम्ही रोज न चुकता भेटत होतो.
बारावी नंतर दिवाकर इंजिनिअरिंग ला गेले आणी मी बीकॉम करत होते. पण आम्ही नियमित भेटत होतो.
आम्ही दोघे वेगवेगळ्या जातीचे होतो. माझ्या घरच्यांना दिवाकर हा खूप आवडत होता म्हणून माझ्या घरच्यांकडून विरोध नव्हता पण तुझे सासरे हे खूप विरोधात होते. तरी दिवाकरला खात्री होती की आपण वडिलांना पटवू.
पण अचानक दिवाकर च्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणी त्यांनी त्याच्याकडून तूझ्यासोबत लग्न करण्याची शपथ घेतली. आणी अखेरचा श्वास घेतला.
आता दिवाकरला तुझ्याशी लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता.
मला एकदाच भेटायला आला तो आणी म्हणाला मी लग्न करतो आहे. तू पण तूझ्या आयुष्यात पुढे जा, मागे वळून बघू नकोस, मी हो म्हणाले" पण मी कधी लग्न करणार नाही मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय दिवाकर असं माझं मन जोरजोरात ओरडून सांगत होतं."
मी एकटी राहत होते, सुरवातीला माझ्या आईवडिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी लग्नाला तयार झाले नाही. मी दिवाकर शिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करू शकत नव्हते.
दिवाकर ला माझ्याबद्दल काहिच माहित नव्हते. मी मात्र त्याची नेहमीच खबर ठेवायचे त्याच्या एका मित्रा मार्फत. तो कुटुंबासाठी आपलं सर्वस्व देत होता. तो आपल्या आयुष्यात पुढे गेला होता, पण या सहा महिन्यात तो मित्रही विदेशी गेल्याने मला दिवाकर च्या कर्करोगाबद्दल तो देवाघरी जाण्याच्या आधल्या दिवशी कळाले.जसं कळाले मी धावत पळत दिवाकर ला भेटायला आले.तेव्हा दिवाकर ला माझ्या विषयी सर्व कळलं.
माझ्या मागे माझ्या कुटुंबाचे काय होणार? मी तर कर्ज ही काढले आहे. मी काही प्रापर्टी पण कमावून ठेवली नाही.
मी दिवाकरला म्हणाले माझे प्रेम निभावण्याची आता खरी वेळ आहे. मी तूझ्या कुटुंबाची पूर्ण पणे जबाबदारी घेण्याचे वचन देते.
हे ऐकून वासंती म्हणाली पण दिवाकरने कधी तुझा विषयही माझ्या जवळ काढला नाही.
रेणुका : तसं आम्ही ठरवलं होतं. मी दिवाकर ला माझी शप्पथ घातली होती. परिस्थिती तशी उद्भवली म्हणून त्याचे लग्न तूझ्याशी झाले हे मला चांगलेच समजले होते.
वासंती खूप रडायला लागली. लागलीच रेणुकाने तिला जवळ घेतले आता तरी मला माझे प्रेम मला निभावू दे. म्हणजे मला दिवाकर जवळ असल्याची मला जाणीव होत राहील.
रेणुकाने अगदी शेवटपर्यंत तीची जबाबदारी पार पाडली. दिवाकरचे मुलं म्हणजे तिचे मुलं. आणी त्या मुलांची ती मोठी मम्मी...........
©®डॉ सुजाता कुटे

0 टिप्पण्या