लग्न झाल्यावर पाहिलांदाच आरतीच्या सासूबाई गोपिकाबाई आज आरतीकडे येणार होत्या. आरतीच्या मनामध्ये विचारांची कालवाकालव होत होती.तिला वाटत होते की सासूबाईंना आपले घर आवडेल ना. तिने टेन्शनने ऑफिसला सुद्धा सुट्टी टाकली होती.एक कामवाली बाई लावून घराची पूर्ण स्वच्छता करून घेतली. आरतीचे यजमान अजय देखील तिला हातभार लावत होते. सगळी आवरासावर केली. दोघा नवरा बायकोने मिळून साग्रसंगीत स्वयंपाक केला
आरती आणि अजय नौकरी निम्मित मुंबईला राहत होते.भरपूर शेतजमीन असल्या कारणाने गोपिकाबाई कोल्हापूरला आपल्या नवऱ्यासोबत( भाऊराव ) शेती पाहत होत्या. गोपिकाबाई तश्या कडक पण प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या स्वभावाची अगदी फणस म्हणून ख्याती होती. अजय रेल्वे येण्याच्या दहा मिनिटे आधी पोहोचला.आणि ट्रेन येण्याची वाट बघत बसला आई ज्या डब्ब्यात आहे तो प्लॅटफॉर्म वरचा अंदाजा घेऊन तिथे रेल्वे ची वाट बघत राहिला.
ट्रेन आली. गोपिकाबाई बरोबर अजय समोरच उतरल्या. अजयने ताबडतोब सामान उचलले व दोघेही gate च्या दिशेने निघाले.
इकडे घरी आरती त्यांची वाट बघत होती. तिला गोपिकाबाईंच्या स्वभावामुळे त्यांची अनामिक भीती वाटत होती. दारावरची बेल वाजली टिंग टॉंग.... आरतीने दरवाजा उघडला. गोपिकाबाईने अजयला आपले सामान घेऊन रूम मध्ये ठेवायला सांगितले. घर एकदम मोठे दिसत होते. थ्री बेडरूम एक किचन वेल furnishedअसं घर होतं. सगळ्या वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवलेल्या होत्या. आरतीने लगेच फ्रेश होण्यासाठी सासूबाईंना टॉवेल दिला.व लगेच जेवायला वाढून घेतले. गोपिकाबाई आरतीच्या या स्वागतावर खूप खूष झाल्या. आरतीला देखील गड जिंकल्यासारखा आनंद झाला होता. पाहिला दिवस छान गेला. पण आता दूसरा दिवस??
दुसऱ्या दिवशी गोपिका बाईंना काही वेगळेच चित्र दिसले. अजय सकाळी लवकरच उठला. त्यानेच चहा नाश्ता बनवला. थोडया वेळाने आरती देखील उठली आणि तयारीला लागली.ते पाहून गोपिकाबाईच्या कपाळावर आठ्या पडल्या.आपला मुलगा जो की गावाकडे स्वतःच्या हाताने पाणी सुद्धा घेत नाही आता बायकोची चाकरी करतो. बायकोच्या आधी उठतो काय चहा नाश्ता करतो काय, हे गोपिकाबाईच्या पचनी पडलं नव्हतं. थोडया वेळाने आरती ऑफिसला निघून गेली.अजय मात्र घरीच. सगळी आवरासावर करत होता. त्याने झाडू हातात घेतला आणि घर झाडू लागला. आता तर गोपिकाबाई चा पारा चढला. हे काय अजय तूला ऑफिस वगैरे नाही का? एखादी कामवाली बाई लावायची.
अजय:अगं आई मी दिवसभर रिकामाच असतो ना मग हे काम केले तर काय वाईट? तू उगाचच त्रागा करून घेतेस.
गोपिकाबाई :अरे पण तू ऑफिसला वगैरे जात नाहीस का?
अजय :अगं आई मी work from home करतो म्हणजे इथेच कामे करतो ऑफिस ची ती पण जास्त नसतात.
अजयने दुपारचे जेवण बनवले. पण गोपिकाबाईच्या ते घश्याखाली उतरले नाही. मनोमन त्या आरतीला खूप शिव्या देत होत्या. माझ्या मुलाला ताटाखालचं मांजर केलंय. काय काय करायला लावते कोन जाने. आरती रात्री घरी आली तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. गोपिकाबाई वाटच पाहत होत्या. अजयने गरम गरम आणि एकदम छान स्वयंपाक बनवला होता. जेवण झाल्यावर गोपिकाबाईने बोलायला सुरुवात केली. आरती तूला थोडं तरी काही वाटतं का की तू तुझ्या नवऱ्याला काय काय काम करायला लावतेस.गावी अगं पाणी सुद्धा हातात द्यावं लागत होतं आणि आता झाडू, पोछा धुनी, भांडी स्वयंपाक.... एखादी बाई तरी लावायची.
आरती शांतपणे बोलायला लागली. आई सध्या अजय house husband आहे. House wife असते ना तसं. रागावू नका पण हे ही काही वाईट नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना अजय ला खूप चांगल्या पगाराचा job होता.त्या काळात आम्ही हे घर कर्ज काढून विकत घेतले. तसंच ती कार सुद्धा कर्ज काढून विकत घेतली. सुरुवातीला आमच्या दोघांचाही job असल्याने आमचे EMI व्यवस्थित भरत होतो. पण अचानक मंदी ने अजयचा job गेला. आता माझ्या पगारात EMI व्यतिरिक्त खाऊन पिऊन सुखी आहोत पण सध्या बायांचा खर्च परवडणारा नाहीये आणि इतक्यात अजयला job मिळणार नाही. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की अजय ने house husband व्हायचं. तरी तो घरी छोटे मोठे प्रोजेक्ट तयार करत असतो. घर दोघांचं आहे दोघांनी मिळून चालवायचं आहे. मग इथे मी नौकरी केली आणि त्यानी घरकाम तर बिघडलं कुठे.
काळाची गरज आहे असं वागणं. उद्या आम्हाला मुले झाली तर ते स्त्रियांचे हे काम आणि पुरुषांचे हे काम असा फरक तरी ते करणार नाहीत. आपण.. आपल्या आईने घरकाम केले आणि वडिलांनी पैसे कमावले हेच पाहत आलो त्यामुळे आपल्याला विचित्र तर वाटणार. आपल्या पुढच्या पिढीला तरी ते विचित्र वाटणार नाही. गोपिकाबाईंना आरतीचे विचार पटले.त्यांना वाटलं आपण एक स्त्री असून हे सगळे समजून घेऊ नाही शकलो.
माझ्यासाठी पोहे बनव बरं.... गोपिकाबाईने अजय ला ऑर्डर दिली
पोस्ट आवडल्यास like करा. Share करायची असल्यास नावासहित share करा.
डॉ.सुजाता कुटे
0 टिप्पण्या