"अखेर..... पैठणी जिंकली "

आज मै उपर,आसमा नीचे आज मै आगे जमाना है पीछे श्रुती मनोमन बेधुंद होऊन नाचत होती. कारणच तसे होते....कॉलनीत आलेल्या कोण जिंकेल पैठणी मध्ये तिने सगळ्याच प्रश्नाचे उत्तरे दिली होती आणि प्रथम क्रमांक पटकावला होता. तिला हवी तीच पैठणी होती आणी तिचा प्रथम क्रमांकही आला होता. अशी दोहेरी खुशी तिच्या वाट्याला आली.

श्रुती एका मध्यमवर्गीय घराण्यातील मुलगी. तीचं शिक्षण बी. ए. बीऍड. सोबत चार महिन्यांचं बाळ शुभम.  आणी तीचा नवरा सुरेश एका खाजगी प्राथमिक शाळेत नौकरी करत होता. जेमतेम पगार. खाजगी शिकवणी मिळून कसे तरी महिन्याकाठी दहा हजार कमवत असे. त्यातच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.
श्रुतीला तिच्या मैत्रिणीने प्रितीने तिच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचे सहकुटुंब आमंत्रण दिले.श्रुती देखील तीची प्रसूती झाल्यानंतर फिरायला असं म्हणून कधीच घराबाहेर पडली नव्हती. त्यामुळे ते आमंत्रण तिने आनंदाने स्वीकारले.

श्रुती छान तयार झाली सुंदर अशी चॉकलेटी रंगांची जॉर्जेट साडी तीने नेसली. हलकासा मेकअप केला. बाळालाही छान तयार केले.सुरेश ही तयार झाला आणी ते सगळे प्रितीच्या बाळाच्या वाढदिवसाला गेले.

बापरे इतकी अवाढव्य बिल्डिंग इथेच वाढदिवस आहे ना? श्रुतीने  तिथे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकास विचारले. तो म्हणाला मॅडम इकडे उजवीकडे लॉन आहे. तिथे कार्यक्रम आहे. श्रुतीला पहिल्यांदाच कुणी मॅडम म्हणालं होतं. तीचं मन एकदम हर्षीत झालं होतं. ती लॉन कडे गेली लोकांच्या गर्दीत एकदम पलीकडे तीला तीची मैत्रीण प्रिती दिसली. गुलाबी जांभळ्या रंगाच्या पैठणीत ती खूपच सुंदर दिसत होती. कार्यक्रमही एकदम शाही होता. भोजन ही अगदी पंचपक्वान्न होते. जेवण आटोपून श्रुतीने आणी सुरेशने तिथून रजा घेतली.

पण श्रुती च्या मनात पैठणीने घर केलं होतं. तिला तशीच पैठणी हवी होती. प्रितीशी बोलताना तिने पैठणीची किंमत विचारली. पैठणी वीस हजारांची होती.

वीस हजार रुपये कसे जमतील? दहा हजार रुपयातून आपण कसं बसं हजार रुपये बाजूला काढतो. कमीतकमी वीस महिने तरी लागतील तशी पैठणी घ्यायला. आपल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला पैठणी घालायची असा निश्चय श्रुतीने केला.

तिने हजार रुपये महिना ने भिशी टाकली एकूण दहा मेंबर झाले. म्हणजे भिशी लागेल तेव्हा दहा हजार एकदम मिळतील. आता राहिला बाकीच्या दहा हजार रुपयांचा प्रश्न तो कसा सोडवायचा? तीने शिकवणी सुरु केली पण तेही पूर्ण होत नव्हतं. मग तीने स्वतः साठी चहा मध्ये साखर बंद. आणी महागडे पदार्थ कमी वापरून अखेर तो दिवस उजाडला तिच्याकडे वीस हजार रुपये जमा झाले.अजून वाढदिवसाला पंधरा दिवस बाकी होते. वा आपण ते करून दाखवलं असं म्हणत तिने स्वतःची पाठ थोपटली.

अचानक शेजारी श्रुतीला जोरजोरात रडण्याचा आवाज आला. श्रुती लागलीच आवाजाच्या दिशेने पळाली. पाहते तर तीची शेजारीण नीता होती. तीचा आठ वर्षांचा मुलगा प्रणव खूप सिरीयस होता त्याला डेंगू झाला होता. त्याच्या उपचारासाठी तिला पंचवीस हजार रुपये लागत होते. पण ती फक्त पाच हजार रुपये जमवू शकली होती. बाकीचे वीस हजार आणणार कुठून? हतबल झाल्याने ती धाय मोकलून रडत होती.

श्रुती आता गहन विचारात पडली. तिने विचार केला जाऊदे पैठणी इतकी महत्वाची नाही. प्रणवचा जीव वाचणं महत्वाचं. तीने ते पैसे घेतले आणी लगेचच नीताला दिले.जा हॉस्पिटल ला लवकर आणी त्याचे व्यवस्थित उपचार करून घे असे तिला म्हणाली. नीताने श्रुती समोर हात जोडले आणी ओल्या
डोळ्यांनी तीचं आभार मानले.मग हॉस्पिटल ला गेली.

प्रणवची तब्येत आता सुधारायला लागली होती. आणी श्रुतीच्या बाळाचा म्हणजेच शुभम चा वाढदिवस अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला होता. आता तो कसा साजरा करायचा हे विचार करत असतानाच बाहेर कसला तरी जाहीर करण्याचा आवाज येत होता.श्रुती बाहेर आली तर "कोण जिंकेल पैठणी" अशी स्पर्धा चालू होती. फक्त त्यांच्या पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. पहिल्या तीन स्पर्धकांना तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी बक्षिस होती. श्रुतीने भाग घेतला. आणी पाचही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. तीचा प्रथम क्रमांक आला आणी तिला हवी तीच पैठणी मिळाली. तीला वाटलं "मन चांगलं तर सगळंच चांगलं "आता ती शुभम च्या पहिल्या वाढदिवसाला पैठणी नेसणार होती...

©®डॉ सुजाता कुटे.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या