"अन्नदाता"

सयाजी हाडाचा शेतकरी होता. खूप मेहनती होता.शेतामध्ये राब राब राबत असे. पाच एकर कोरड वाहू जमीन त्यावर जगणारी, खाणारी तोंडे आठ.कुटुंबात सयाजी त्याची बायको मथुरा मुली मुक्ता, संगीता, सुनीता आणि मुलगा दीपक आणि त्यांचे आई वडील इतके मेंबर्स होते अगदीच जेमतेम उत्पन्न व्हायचं.दरवर्षी एक बोर मारायचा पण त्याला पाणी लागत नसे.शेवटी एका कोपऱ्यात खूप पाणी लागले. सयाजीला खूप आनंद झाला आता तो त्याचं पूर्ण शेत पाण्याखाली आणायचा विचार करत होता.पाणी लागल्याने घरातील प्रत्येकजन खूष होता.सयाजिच्या बायको मथुराने वाजत गाजत शेतात जाऊन सुवासिनी जेऊ घातल्या होत्या.
सयाजी दरवर्षी होणाऱ्या पाणी टंचाईला खूप कंटाळला होता. म्हणून त्या बोरपासून त्याने पूर्ण शेतात पाईपलाइन करायची ठरवली.त्यासाठी त्याने कर्ज काढले आणि पूर्ण शेतामध्ये पाईपलाईन केली.आता त्याचे कोरडवाहू शेत पाण्याखाली आले होते.
मृगाचा पाऊस पडला. पेरणीला सुरुवात झाली.यावेळेस सयाजी, मथुरा व त्याच्या दोन मुली सगळ्यांनीच पेरणी केली. पेरणी करतानाच मुक्ता ला पायाला साप चावला.तिला ताबडतोब सरकारी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं.नशीब सापाचे विष जास्त पसरलं नव्हतं. आणि ती लवकरच बरी झाली.
सयाजी:मथुरा यंदा चांगले उत्पन्न होऊ शकते.चांगले उत्पन्न झाले की मुक्ताच्या लग्नाचा बार उडवून देऊ.सयाजी दिवास्वप्न बघू लागला.
सयाजीने सोयाबीनची पेरणी केली अगदी चांगलं बियाणं मागवलं होतं पेरणी पूर्ण झाली होती.पाऊसही मनासारखा पडत होता.त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होत होती.त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न होणार याची त्यांना खात्री झाली होती.
वेळोवेळी निंदणी मात्र करावी लागत होती.पण बियाणं चांगलं असल्याने फवारणी जास्त करायची गरज पडत नव्हती.पिकं मात्र हिरवीगार होती.त्यामुळे सयाजी आनंदात होता.
सोयाबीन काढायची वेळ आली पण या वर्षी पावसाचा सूर काही वेगळाच होता.पाऊस काही थांबायचं नावच घेईना.आता मात्र सयाजी चिंतेत पडला.एकसारखा पाऊस शेवटी त्या पिकांची व्हायची ती नासाडी झाली. सयाजी आता मात्र हतबल झाला.हे काय आपल्या नशिबी..... दरवर्षी शेती करतो ती कोरडवाहू जमीन आज पाण्याखाली आहे तर निसर्ग कोपला.आणि वर हे कर्ज? कुठे तरी या वेळेस वाटले की सुखाचे दिवस येतील.पण... यावेळेस आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस आणि तो ही अवेळी.

सयाजी (स्वगत )मुक्ताच लग्न?? ते तर आता लांबणीवर.... कर्ज  काढले ते वेगळेच. शेवटी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गरीबी असणार. सरकार नुकसान भरपाई देईल पण त्यात आपलं कर्ज थोडीच फिटणार.कर्ज माफ ही होईल पण हे चक्रव्युव्ह संपणार कधी? सयाजी मनाने खंबीर होता आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे तो मानायचा.पण त्याला परिस्थितीच्या ह्या चक्रव्यूव्हातून बाहेर पडता येत नव्हते.आणि आता तर सोयाबीनच्या झाडांमधील शेंगाना कोंब आले होते.सयाजीचे खूप नुकसान झाली सारी मेहनत वाया गेली.
आता कालचेच दिवाळीच्या वेळेसचे उदाहरण घ्या ना ज्या लोकांनी मेहनत करून झेंडूच्या फुलांची शेती केली.विकायला बसल्यावर पाऊस आला.त्या लोकांना जसे च्या तसे झेंडू चे फुलांचे साठे रस्त्यावर सोडून पळावे लागले.इतके दिवस त्या फुलझाडांना लेकरासारखं जपलं आणि शेवटी तसंच सोडून पळावं लागलं.अश्या प्रकारे त्या शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली.
हे असे दुष्टचक्र आहे की इथे शेवट पर्यंत काही सांगता येत नाही. कितीही कष्ट करा नशिबाच्या परीक्षेत तुम्ही नापासच होता आणि क्वचित पास होतात.
जर (शेतकरी)अन्नदाता  नसतील तर काय डॉक्टर,काय इंजिनिअर,काय पोलीस आणि काय आर्मी.
सख्यानो मला प्रामाणिकपणे इथे असे वाटते की अन्नदाता असेल तर आपण असू.आणि काहीतरी योजना अश्या असाव्यात की अशा अल्पभूधारक, कोरडवाहू जमिनी असलेल्या लोकांना पगाररुपी आर्थिक मदत व्हावी. कमीत कमी त्यांचा उदरनिर्वाह होईल इतकी. म्हणजे निघणाऱ्या उत्पन्नात त्यांना नफा मिळेल.सरकार सध्या बऱ्याच योजना राबवते, नुकसान भरपाई देते पण त्याने अश्याने शेतकर्यांचं पोट भरत नाही ना. कधी कधी अश्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत ही नाही.आता सगळ्यात महत्वाचा टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे ऑनलाईन अर्ज करने. तिथेही ते बिचारे शिक्षणामुळे अथवा अपुऱ्या माहिती मुळे मागे पडतात.
आणि इथे मांडायचा हेतू हाच की त्यांना किती दिव्व्यातून जावे लागते याची आपल्याला जाणीव असावी.

लेख आवडल्यास like करा, share करायचं असल्यास नावासहित share करा.
©® डॉ सुजाता कुटे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या