आठ ते दहा लोकांचा घोळका मला अपघात विभागात येताना दिसला.इतके लोकं पाहून मी समजून गेले होते की खूप सिरीयस रुग्ण हे लोकं घेऊन येत असणार.. त्या लोकांनी अगदी पळत पळत अपघात विभागात एन्ट्री केली... सोबत स्ट्रेचर ट्रॉली वर पूर्ण रक्ताने माखलेला माणूस आणलेला होता....
अंदाजे तो बावन वर्षांचा असेल
त्याला पाहून त्याला खूप मोठा अपघात झाला असेल असे वाटत होते....
मग प्राथमिक तपासणी मध्ये मी विचारले असता त्याला मारहाण झाल्याचे कळले.... मला तर तो पहिला धक्काच होता.... कारण त्या माणसाला खूप अमानुष पद्धतीने मारहाण झालेली होती.... त्याचे दोन्ही हात fracture करून टाकलेले होते.... त्याचा एक पाय fracture केला होता.... त्याला लोखंडी रॉड ने बेदम मारहाण झालेली होती.... पायावर आणि हातावर कुऱ्हाडीचे मोठे घाव होते.... त्याला अगदी जवळ जवळ मारून टाकायचा प्रयत्न झाला होता..... आणि तिथे तो निपचित पडला होता..... मेला असे समजून सोडून देण्यात आले होते... म्हणून तो वाचला होता...
संपूर्ण प्राथमिक उपचार झाल्यावर नियमाप्रमाणे मी पोलिसांना कळवले... की अपघात विभागात एक मारहाण झालेला व्यक्ती आणला आहे.... नंतर नियमाप्रमाणेच मी त्याची माझ्याकडे नोंद करायला लागले....तेव्हा विचारले... मारहाण कुणी केली?? त्यांनी जेव्हा मारहाण करणाऱ्याचे नाव सांगितले तेव्हा मला दुसरा धक्का बसला.... कारण ते दुसरे तिसरे कुणी नसून सक्ख्या भावाने मारहाण केलेली होती...
पण त्या रुग्णाची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त होती की तो आम्हाला फक्त एवढंच म्हणत होता की तुम्ही फक्त माझे हे दुखणे कमी करा.... नव्या जोमाने मी उभा राहतो की नाही ते बघा.... इंजेक्शन दिल्यावर त्याचं बरचसं दुखणं कमी झालं होतं.
पोलीस त्याचं स्टेटमेंट घ्यायला आले... तो रुग्ण सुरुवातीला काहीच बोलायला तयार नव्हता.... मी फक्त तो पोलिसांना काय सांगतो याच्याकडे बघत होते.... तो काहीच उत्तर देत नाही हे पाहून त्याचा मुलगा सांगायला लागला..... त्याने त्याच्या काकाचे नाव सांगितले तेव्हादेखील त्या रुग्णाला मात्र आपल्या भावाचे नाव पोलिसांना सांगू नये असेच वाटत होते.... पण त्याच्या अमानुष मारहाणीपुढे त्यांना खरं काय ते सांगणं भागच होते....
त्या माणसाला जी मारहाण झाली होती ती त्याला एकटं साधून चार पाच लोकांनी मारहाण केली हे स्पष्ट समजत होतं.... तरी देखील त्या रुग्णाने मोजकीच नावे घेतली.... शेवटी त्याच्या मुलाने आपल्या चुलत भावाचे नाव घेतले..... तो रुग्ण त्याच्यावर ओरडला.... अरे त्याचं नाव नको घेऊस त्याचं अजून आयुष्य बाकी आहे....
बापरे मी तर हे बघून अवाक झाले.... असेही माणसे या जगात असतात.... खरं तर त्याचा मार पाहिल्यावर मला मनापासून असे वाटत होते की त्या रुग्णाला मारहाण करणाऱ्या माणसांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे.... पण मला तर वेगळेच चित्र दिसले.... एवढ्या त्रासातही तो त्याच्या भावाचा आणि त्याच्या मुलाच्या आयुष्याचा विचार करत होता.
कथा आवडल्यास like करा,share करायची असल्यास नावासहित share करा
©®डॉ सुजाता कुटे
0 टिप्पण्या