तिचं नाव अबोली.अगदीच कळीप्रमाणे तीही उमलत होती.उमलत असताना तिच्या सोबत तिच्या स्वप्नांनाही पंख फुटत होते.नकळत आरश्यासमोर ती जास्त वेळ घालवायला लागली होती. अबोली नुकतीच वयात येऊ लागली होती.आरश्यात बघताना एखादी तारुण्यपिटिका दिसली की तिच्या जीवाची घालमेल व्हायची.
मग अबोली हळुवार आईला म्हणायची आई हे मुरूम बघ ना माझ्या चेहऱ्यावर किती घाण वाटत आहेत.आई म्हणायची बेटा हे या वयात येतच असतात तू चंदनाचा लेप लावत जा मग कमी होईल.
मग अबोली कसंतरी तोंड करून तोंड धुवायला जायची.
आता अबोलीला सक्ख्या मैत्रिणी देखील झाल्या होत्या. त्यांच्या सोबत ती जास्त वेळ राहू लागली.सक्ख्या मैत्रिणींसोबत ती सीक्रेट share करू लागली होती.
तशी अबोली ध्येयवेडी होती.आयुष्यामध्ये आपण काहीतरी असे काम करायचे ज्याने आपले तर भले होईलच पण समाजाचं पण भलं झालं पाहीजे असं तिला सतत वाटायचं.सोबतच तिला नृत्याचीही खूप आवड होती.नृत्यकलेत ती पारंगत होती.नुसतं नृत्यच नाही ती अगदी सगळ्या गोष्टीत पारंगत होती.रांगोळी असो की बुलेट चालवणे सगळ्यातच ती निष्णात होती.
अबोलीच्या अशा सर्वगुण संपन्न असल्याने तिचं खूप कौतुक व्हायचं. तिची वागणूकही नम्र अशी होती. सगळ्यांशी प्रेमाने बोलायची.कधीच उलट उत्तरे किंवा उद्धट उत्तरे द्यायची नाही.त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिचा अभिमान होता.
कुणीतरी राजबिंडा राजकुमार घोड्यावर येईल आणि तिला सोबत घेऊन जाईल असे स्वप्न ती नेहमी पहात असे आणि आईला म्हणत असे.... आई बघ माझ्या आयुष्यात एक राजकुमारच घोड्यावर येईल.. आणि मला घेऊन जाईल .... मग आई म्हणायची... हो मग... माझी राजकन्याच आहेस तू.... तूला राजकुमारच भेटणार. पण बेटा ही ती वेळ नाही..तूला ना आधी स्वावलंबी आणि कर्तृत्ववान व्हायचे.... मग अबोली आईच्या जवळ यायची आणि लडिवाळ पणे म्हणायची अगं आई मी कुठे आताच म्हणतेय? पण जेव्हा येईल तेव्हा राजकुमारच येईल.
काय चाललंय मायलेकीचं? दरवाजातून आत येताना अबोलीचे पप्पा बोलायला लागले.अबोली एकदम घाबरी घुबरी होऊन बेडरूम मध्ये पळाली. तर आई म्हणाली आपली राजकन्या आता मोठी होत आहे...
अबोलीचा sweet sixteen birthday तिच्या आई पप्पा नी साजरा केला.....वाढदिवसाच्या दिवशी अबोली अगदी सिंड्रेला सारखी नटली होती.तिने फ्रिल असलेला लांब गाऊन घातला होता.डोक्यावर crownआणि सुंदर मेक अप असा साजेसा साज शृंगार तिने केला होता.अबोलीच्या आई पप्पा ने तिला आठवतं तसं हा तिचा पहिलाच वाढदिवस इतका मोठा साजरा केला होता. त्या पार्टीमध्ये आई पप्पा आणि अबोली यांच्या जवळील मित्र मैत्रिणी हजर होत्या.
पप्पा च्या एका मित्राच्या मुलावर तिची नजर पडली.आणि तिला काळजात एकदम धस्स झालं.अरे हे काय आपलं हृदय का धडधड करत आहे?असं अबोली मान खाली करून मनात म्हणाली.तिने पुन्हा मान वरती केली आणि त्या जागी तिची नजर शोधू लागली.कुठे गेला?? आता एकदम हृदयाचे ठोके वाढले तो एकदम समोरच... smile देत "wish you many many happy returns of the day"
अबोली मानत लाजून चुर्र झाली. आणि म्हणाली thanks. तितक्यात पप्पानी अबोलीला आवाज दिला.हा पप्पा असं म्हणत ती निघून गेली.
अबोलीचे आता कशातच मन लागत नव्हते ती बेचैन होत होती. सिनेमातील नटनट्याव्यतिरिक्त प्रथमच तिला कुणीतरी आवडलं होतं. पन हे काय?? आपण तर त्याचे नाव सुद्धा नाही विचारले.. 😥 आता? आता कसं शोधणार?
अबोली रोज त्याला खूप miss करायची.तो नक्की पून्हा भेटेल असं तिचं मन म्हणायचं.
आज अबोलीचा अकरावीचा पहिलाच दिवस होता.शालेय जीवनातून तिने महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला होता.ती कॉलेज मध्ये गेली आणि तिचा वर्ग शोधू लागली.तितक्यात एका मुलाचा आवाज तिने ऐकला हॅलो तू अबोली ना?? अबोली मागे वळून पाहते तर तोच हो हो तोच चेहरा..... ती म्हणाली हो मीच अबोली.
तो म्हणाला मी आलो होतोना तूझ्या sweet sixteen बर्थडे सेलेब्रेशनला तूला कदाचित आठवत नसेल.इकडे अबोली मनोमन सुखावली होती.पण आठवल्यासारखे करून.... हा आठवले.... पण अरे मी तुझे नावच नाही विचारले. खरं तर तिचं हृदय खूप धडधड करत होतं पण ती चेहऱ्यावर तसुभरही भाव दिसू देत नव्हती.
तो म्हणाला समीर देसले...
अबोली :अच्छा तर देसले काकांचा मुलगा तू?? ...
समीर :हो, कसं करतेस गं इतकं सगळं?? आमच्याघरी नुसतं तुझं कौतुक चालू असतं.
अबोली तर आता खूपच खूष झाली पण ते न दाखवता म्हणाली... :11 D क्लास माहिती आहे का?
समीर :हो, चल माझा क्लास 12th D तूझ्या क्लास च्या बाजूला आहे.मी तूला सोडतो.
पायऱ्या चढून आल्यावर पहिल्या मजल्यावर शेजारी शेजारी दोघांचे क्लास होते.
अबोली (मनात ):अच्छा समीरने ही कॉमर्स घेतले आहे तर... म्हणजे आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात...हो हो हाच तो राजकुमार माझ्या मनातला असं मनात म्हणत "मनमोहना तू राजा स्वप्नातला "असे गुणगुणायला लागली.
आता समीर आणि अबोलीची रोज भेट होत असे.रोज सोबतच ते कॅन्टीनला जात असत.अबोलीतर आता पूर्ण पणे समीर वर अवलंबून राहायला लागली.तो जर एक दिवसही कॉलेजला आला नाही तर ती बेचैन व्हायची त्याला फोन करून बोलावून घ्यायची.
समीर मात्र अबोलीला सक्खी मैत्रीण मानायचा.तिचं त्याच्या घरात होणारं कौतुक बघता तो तिला वेगळ्या आदराने बघायचा.
अबोलीने आता ठरवले होते valentine day ला समीर ला प्रपोज करायचे.तिला तो हो म्हणेल की नाही याची धाकधूक होती.पण तिला वाटायचं तो किती काळजी करतो माझी आणि हो म्हणाला तर?? तिने त्याच्यासाठी एक सुंदर गुलाबाचे फुल आणि ग्रीटिंग आणले. त्यावर त्याच्यासाठी स्वलिखित एक कविता लिहिली.
"मनी माझ्या वसतोस तू "
"स्वप्नी माझ्या दिसतोस तू "
"येशील का जीवनी माझ्या "
"माझे आयुष्य फुलवशील तू "
आणि कॉलेजमध्ये समीर येण्याची वाट पहात होती. तितक्यात अबोलीच्या हृदयाची स्पंदनं वाढायला लागली.समीर समोरून येताना दिसला.अबोलीने त्याला आवाज दिला.समीर चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊ...
समीर अगं recess मध्ये जाऊ ना...
आता दहा मिनटात lecture सुरु होईल.
अबोली :दहा मिनिटे आहेत ना.चल फक्त चहा घेऊ असं म्हणत तिने समीरला कॅन्टीन मध्ये नेले. आणि इकडे धडधड तर होत होती पण वेळेअभावी तिने पटकन बॅग मधून ग्रीटिंग आणि गुलाबाचे फुल काढले आणि त्याच्यासमोर table वर ठेवले.
समीरला ते अनपेक्षित होतं. हे काय?? तो जवळ जवळ ओरडलाच.आता मी lecture ला जातोय.नंतर बोलू.
समीर वर्गात बसला पण अबोलीने अनपेक्षितरित्या प्रपोज केल्याने तो रागात आलेला होता.मनात सारखी धुसफूस चालली होती.असं कसं विचार करू शकते अबोली?? मी तर कधी असा वागलोही नाही. असा बोललो तर चुकूनही नाही. मग आता तिलाच ठाम विचारावे लागेल??
Lecture संपले, समीरची नजर अबोलीला शोधत होती.थोडा तो रागातच होता.तितक्यात तिथे अबोली आली.... दोघे सोबतच कॅन्टीनला गेले. कॅन्टीनकडे जाताना दोघेही अवाक्षरही बोलले नाही...
बसल्या बसल्या समीरने अबोलीला प्रश्न केला.... अबोली मी तुझ्याशी असे कधी वागलो का? खरंच माझं वागण्यात काही चुकलं का? तू असा का अर्थ काढलास?
अबोली: समीर प्लीज तू आधी माझ्यावर रागावू नकोस.... हे बघ तूला मी माझ्या बर्थडेला पाहिलं तेव्हाच मला तू खूप आवडला होतास.....तेव्हा मला तुझे नाव देखील माहिती नव्हते.
समीर :हे बघ अबोली मी स्पष्टच सांगतो.मी तूला अश्या नजरेने कधीच पाहीले नाही.... आता तर आपल्या करियरची दिशा ठरणारे वर्ष आहेत आपल्या हातात. माझं एम चांगला CA होण्याचं आहे. मी ऐकलं की ती परीक्षा अवघड आहे. आतापासूनच मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे.तुझं पण आताच अकरावी आहे. चांगला अभ्यास कर... करियरची दिशा ठरव मग ह्या सगळ्या गोष्टी आहेतच.चल निघूया आपण.... मला अभ्यास करायचा आहे...
अबोली ते ऐकून एकदम सुन्न झाली.तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.मिळालेला नकार तिला अनपेक्षित होता.पण तरीही समीरने तिला सांगितलेल्या कारणामुळे ती पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडली.त्याचं बोलणं प्रॅक्टिकल होतं पण अगदी खरं होतं.म्हणून तिने समीरच्या उत्तराला अगदीच सकारात्मक पद्धतीने पाहीले.
अबोली :बरं आपण आधीसारखे तर राहू शकू ना? समीर : माझी काहीच हरकत नाही असे म्हणत दोघेही आप आपल्या घरी गेले.
घरी गेल्यावर तिचे कशातही लक्ष लागत नव्हते.तिला असे पाहून आईने एक दोन वेळेस विचारलेही.... काय झाले अबोली.तू अशी उदास का वाटत आहेस? अबोली :काही नाही आई थोडीशी थकली आहे मी.आता आराम करते.असे म्हणत अबोली बेडरूमकडे वळाली. अबोली विचार करत होती.... खरं म्हणतो आहे समीर... आधी करियरच्या वाटा..... पण नंतरही तो आपला नाही झाला तर?? मी असा राजकुमार शोधलाय ज्याच्या स्वप्नात मी नाहीये.जाऊ दे आपलं नशीब आणि आपण.... आणि हे स्वप्न साकार होण्यासाठी दोघांनी मिळून स्वप्न बघितले पाहीजेना तरच त्या स्वप्नाला अर्थ असतो. अबोली रात्रभर विचारच करत होती.समीरचा नकार तिच्या नजरेसमोरून जातच नव्हता. क्षणभर तिला वाटायचं.... मी इतकी वाईट आहे का? की दिसायला सुंदर नाही.... का नसेल मी आवडत त्याला? रात्रभर तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.. दुसरा दिवस उजाडला..... अबोली एका नव्या उत्साहाने तयार झाली..... जसे की काल काही झालेच नाही. म्हणतात ना कधी कधी सूर्योदय आपल्यामध्ये एक नवीन बदल घडवून आणतो ना तसं काहीसं. अबोली नेहमीसारखीच समीरशी वागत होती.... समीरलाही सुरुवातीला आश्चर्य वाटले.पण नंतर दोघेही तो विषय विसरले.... तसं अबोली मनातल्या मनात कुढत होती,एकतर्फी प्रेम करायची पण समीरला कधी याची जाणीव होऊ देत नसे.त्याची नेहमीप्रमाणे काळजी घ्यायची.सतत त्याच्या आजूबाजूला असायची छोटया मोठया अडचणी सोडवायची.... सोबत सोबत स्वतःही नियमित अभ्यास करायची.वेळोवेळी समीरचं मार्गदर्शन घ्यायची. असं करत समीरचं बारावी संपलं.कॉलेज बारावीपर्यंतच होतं.कॉलेज सोडताना समीरला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.आणि नकळतच अबोलीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. समीरचं आता graduation साठी दुसऱ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन झाले.आणि CA एंट्रन्स साठी त्याने classes लावले.
आता मात्र समीरला अबोलीची आजूबाजूला असण्याचा भास होत होता.कारण त्याला तिची सवय झाली होती.आता त्याला विरह सहन होत नव्हता.मग उगाचच मित्रांच्या निमित्ताने तीन ते चार दिवसाला तो अबोलीच्या कॉलेजमध्ये जायला लागला होता.
"का असह्य होत आहे "
"माझ्या मनी विरह तुझा "
"नयनसुख माझे "
" प्रतीमा दर्पणी हृदयात माझ्या "
असे काहीसे समीरचे हाल झाले होते. आता त्याला अबोलीशी खडूसपनाने वागल्याचा पश्चाताप होत होता....मनाशी म्हणायचा खूपच रुष्ट वागलो आपण अबोलीशी..... पण कधी ती भांडली नाही... कधी तिने पुन्हा विचारले नाही की का असे..... आणि आता तर तिची बारावी आहे... समीरने आता ठरवूनच टाकले होते की तिची परीक्षा संपली की त्याच दिवशी अबोलीला प्रपोज करायचे.
आज अबोलीचा बारावीचा शेवटचा पेपर होता.समीरही तिची परीक्षा संपण्याची वाट पाहत अबोलीच्या परीक्षा केंद्राच्या बाहेर उभा होता.तितक्यात समीरला अबोलीचे वडील दिसले आणि त्यानी तिथून काढता पाय घेतला....
समीरला मनातून असं वाटत होतं की ही शिक्षा आहे आपल्याला अबोलीशी कडक आणि रुष्ट वागण्याची.... पण काहीका असेना माझा हेतू तर चांगलाच होता ना.... मी आधी करियरला महत्व दिले त्यात काय चुकलं माझं. मग समीरला वाटायचं नाही नाही तिला नक्कीच पटले असतील आपले विचार......
"इंतिहा हो गयी इंतजारकी आये ना कुछ खबर मेरे यार की गुणगुणत समीरने अबोलीच्या घरी लँडलाईनवर फोन केला. पण पहिल्या वेळेस अबोलीच्या पप्पानी आणि मग आईने फोन उचलला.दोन्हीही वेळेस फोन ब्लॅक.न राहवून अर्ध्या तासाने पुन्हा समीरने फोन केला....
या वेळेस तो अबोलीने उचलला... समीरचं हृदय आता धडधड करत होतं. आणि म्हणाला अबोली मी समीर... समीर देसले..
अबोली :काय समीर मी काय तुझा आवाज ओळखत नाही का?बोल काय म्हणतोस
समीर :कसे गेले पेपर?
अबोली :समीर हे विचारण्यासाठी तू मला नक्कीच फोन करणार नाही मी तूला चांगलं ओळखते... खरं सांग का फोन केलास.
समीर :मला तूला बाहेर भेटायचं आहे. महत्वाचे बोलायचे आहे.कधी भेटू
समीरचा सूर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा होता हे अबोलीने एव्हाना हे जाणले होते. तिने लागलीच त्याला होकार दिला. आपण संध्याकाळी पाच वाजता कॉफी शॉप मध्ये भेटू असे ठरवून तिने फोन खाली ठेवला.
ठरल्या वेळी ते दोघेही कॉफी शॉप मध्ये आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर समीरने डायरेक्ट विषयाला हात घातला.अबोली मला तू खूप आवडतेस..... माझं first इयरला दुसऱ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन झाले आणि तेव्हा मला माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली.... मी नाही राहू शकत तूझ्या शिवाय... सांग ना तू माझी होशील का?
अबोलीला देखील समीरचं प्रपोजल अनपेक्षित होतं.तिने जवळ जवळ आनंदाने उडीच मारली. स्वतःला चिमटा घेत ती म्हणाली पण अरे तुझे करियर? तू त्याला प्रायोरिटी दिली ना मग आता...
समीर :माझी आता बऱ्यापैकी तयारी झाली आहे आणि graduation होई पर्यंत माझी राहिलेली तयारी होईल याची मला खात्री आहे. तसंही आपल्याला सेटल झाल्याशिवाय लग्नाचा विचार थोडीच करायचा आहे.
अबोली :समीर मी अगदीच लहानपणापासून काही स्वप्न पाहत आहे आयुष्यात मला ते पूर्ण करायचे आहेत.ते तूला माझ्या आयुष्याचा भाग म्हणून माहिती हवेत.
पहिले स्वप्न तर तूच आहेस माझ्या स्वप्नातील राजकुमार
दुसरे स्वप्न म्हणजे मी माझ्या आईवडिलांसाठी एकुलती एक त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणार. मला जसे तुझे आईवडील माझे वाटतील तसंच तुलादेखील वाटायला हवं.
तिसरे स्वप्न आणि ध्येय म्हणजे आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे.
आता सांग देशील का साथ मला? समीर तू विचार कर आणि ठरव.
समीर :त्यात काय विचार करायचा?? तुझे स्वप्न ते माझे स्वप्न असे म्हणत त्याने अबोलीचा हात हातात घेतला.आता मी तूला कुठे नाही जाऊ देणार.
अबोली लाजून एकदम चुर्र झाली होती तिचे गाल गुलाबी गुलाबी झाले होते. तिचे मन खूप आनंदी झाले होते. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की समीर तिच्या मनाचा कप्पा पुन्हा ठोठावेल.....
थोडयाफार गप्पा झाल्यावर दोघेही आपआपल्या घरी गेले.घरी गेल्यावर आईने जेवायला हाक मारली पण आज अबोलीचे पोट भरलेले होते ते ही प्रेमाने.... तिचे जेवणात मन नव्हते... नुसते फुलपाखरा प्रमाणे भिरभिरत होते.तिचे आई आणि पप्पा डायनिंग टेबल वर तिचे हाव भाव टिपत होते..... पप्पा म्हणाले सुट्टी लागली म्हणून माझी राजकन्या बरीच खूष दिसत आहे.... अबोलीची तंद्री तुटली आणि तिने मान वर करून हो ना पप्पा खूप रिलॅक्स वाटत आहे. पण आईला मात्र अबोली प्रेमात पडल्याचा अंदाज यायला लागला.
आता पर्यंत अबोली लँडलाईन फोन वरच बोलायची. बारावी होईपर्यंत मोबाईल मिळणार नाही असं तिला सांगण्यात आलं होतं.आणि खरं तर तिलाही मोबाईलची गरज वाटत नव्हती.पण आता..... अबोलीने पप्पाला मोबाईल फोन मागितला. पप्पानी पण लाडकी लेक म्हणून तिला लागलीच मोबाईल फोन घेऊन दिला.
मग काय आता समीर आणि अबोलीचे रोज फोन वर बोलने आणि अधून मधून भेटणे असे सुरु झाले.
अबोलीच्या आईने न राहवून एकदा विषय छेडलाच.... अबोली कूणाला बोलतेस फोनवर तासनतास?? कोणी राजकुमार आला आहे का तूझ्या आयुष्यात.... आईच्या अश्या डायरेक्ट बॉम्बने अबोलीला काय बोलावे ते कळेनासे झाले. कारण ती तिच्या आईला कधी खोटं बोलली नव्हती.अबोलीने काहीच उत्तर दिले नाही... आईने अबोलीला जवळ घेतले बेटा कोण आहे तो?? हे बघ कुणी चुकीची व्यक्ती तूझ्या आयुष्यात नसावी की जेणेकरून तुलाच पुढे पश्चाताप होऊ नये असे आम्हाला वाटते.
आईने फिरवलेल्या प्रेमाच्या हातामुळे अबोली म्हणाली आई समीर देसले त्याचे नाव.... अगं आपल्या देसले काकांचा मुलगा... आम्ही माझी बारावीची परीक्षा संपली तेव्हा पासून आम्ही बोलत आहोत.
आई :अच्छा असं आहे तर.त्याला घेऊन ये एकदा घरी.
अबोलीच्या घरी खूप मोकळे वातावरण होते.अबोलीच्या आईने त्या दिवशी रात्रीच अबोलीच्या पप्पांना ही गोष्ट सांगितली.
देसले हा अबोलीच्या पप्पांचा अगदीच सक्खा मित्र होता त्यामुळे अबोलीचे पप्पा हे ऐकून खूप खूष झाले.ते ही अबोलीच्या आईला म्हणाले घरी नाश्त्याला बोलव त्याला एकदा त्याच्याशी बोलून ठरवू पुढे काय करायचं ते...
अबोलीने समीरला तिच्या आई पप्पाचा निरोप दिला.रविवारी दुपारी नाश्ता करण्यासाठी बोलावण्यात आले होते.तोपर्यंत अबोलीच्या पप्पाने आपल्या मित्र देसले ला काही सांगितले नाही कारण समीरच्या विचारांचा त्यांना अंदाज घ्यायचा होता..... रविवार उजाडला..... समीर आणि अबोलीला घरातील भेटीची अनामिक भीती वाटत होती...काय होईल आज?? आई आणि पप्पांना आवडेल का तो? असं विचार करत ती तयार होत होती.
दारावरची बेल वाजली. अबोलीने पटकन जाऊन दरवाजा उघडला.समोर समीर होता... एकदम नीट नेटका तयार होऊन आला होता. त्याने अबोलीच्या आई वडिलांना नमस्कार केला आणि हॉलमधील सोफ्यावर बसला.
समोरच अबोलीचे आई आणि पप्पा बसले होते.अबोलीने पिण्यासाठी पाणी आणले.... समीर ते गटागटा प्याला... काय बोलतील याची त्याला भीती आणि उत्सुकता होती.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अबोलीचे पप्पा बोलायला लागले. तू म्हणे आमच्या राजकन्येवर प्रेम करतोस?
समीरने होकारार्थी मान डोलावली.
देसलेला हे माहिती आहे का?
समीरने पुन्हा नकारार्थी मान डोलावली.
बरं आता पुढे काय करणार? अबोलीचे तर आताच बारावी झालेय....
समीर :काका आता आम्ही दोघेही खूप अभ्यास करणार.... शिक्षण पूर्ण होऊन सेटल झालो की लग्नाचा विचार करू तशी माझी बऱ्यापैकी तयारी झाली आहे दोन वर्षात मी सेटल होईल आणि तीन वर्षात अबोलीचे graduation पूर्ण होईल.....आणि मला अबोलीचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तेही तिच्या सोबत.
स्वप्न कुठले स्वप्न? असा अबोलीच्या पप्पानी समीर ला प्रश्न केला.
समीर ने अबोलीच्या स्वप्नाविषयी सांगितले.
अबोलीच्या पप्पाना अबोलीचा अभिमान तर होताच पण ती आपला विचार करते हे कळाल्यावर त्यांना खूप गलबलून आलं.
अबोलीचे पप्पा एकदम फिदा झाले समीरच्या उत्तरावर. आणि म्हणाले देसलेला तू सांगतो की मी सांगू?
समीर :थोडासा confuse होऊन... मी सांगतो काका आजच बोलतो पप्पांशी. पण तुमचा आमच्या या नात्याला होकार आहे ना?
अबोलीचे पप्पा :हो..... पण कुठल्याही प्रकारचा विश्वासघात तुमच्याकडून होऊ देऊ नका... अशी जवळ जवळ प्रेमाने तंबीच दिली.
समीरने त्याच रात्री त्याच्या पप्पाना सगळे काही सांगितले. अबोलीचं कौतुक त्यांना होतंच आणि आता सख्खा मित्र त्यांचा व्याही होणार होता... ते ही खूप खूष झाले.
दिवसामागून दिवस गेले... समीरला CA परीक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळाले.. तो CA झाला आणि त्याचे स्वतःचे ऑफिस उघडले. तर अबोलीने नुकतेच बीकॉम पूर्ण केले होते.तिला बँकेत नौकरी करायची होती त्यासाठी ती अभ्यास करत होती.
मनाप्रमाणे सगळे काही घडत होते.ठरल्या प्रमाणे दोघांचे लग्न थाटामाटात आणि निर्विघ्नपने पार पडले. तिच्या स्वप्नातील राजकुमार आता तिचा झाला होता.
आता खऱ्या अर्थाने अबोलीच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला होता. आणि तिचे पहिले स्वप्न पूर्ण झाले होते.आता तिला नौकरी लागली होती त्यातून ती स्वतःचा खर्च काढून बाकी पगार आईला देत असे.दर दोन ते तीन दिवसांना घरी जाऊन त्यांची विचारपूस करत असे. सुरुवातीला समीरच्या आईला या गोष्टी पटल्या नाही. पण अबोली तितकीच आत्मीयतेने त्यांचीही काळजी घ्यायची.तिने कधी कुठल्याही कामात कसूर केला नाही.
अबोली आणि समीरचा संसार आता सुखाचा चालला होता. असं जवळ जवळ वर्षभर चाललं... आता मात्र घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की अबोलीला एक मूल व्हावं.... अबोलीला देखील मनापासून वाटायचं की आपल्याला एक मूल व्हावं पण तिला दिवस राहतंच नव्हते.... आणि येता जाता कुणीही नातेवाईक तिला छेडायचे... any good news? आणि तिने नाही म्हटलं की तिला नानाविध सल्ले द्यायचे.
अबोलीने आता डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला सुरु केली. वंध्यत्व निवारण केंद्रामध्ये तिने आपले नाव नोंदवले. तिथे दोघांच्याही विविध चाचण्या झाल्या.दोघांचेही रिपोर्ट्स तसे 75%नॉर्मल होते. बाकी 25%साठी त्यांना नियमित ट्रीटमेंट घ्यावी लागणार होती. दोघांनी नियमित ट्रीटमेंट घ्यायला सुरु केली. जवळ जवळ दोन वर्ष त्यानी वंध्यत्व निवारण तज्ञाकडे चकरा मारल्या. पण शेवटी यश आले नाही. या गोष्टीचा अबोलीच्या मनावर परिणाम व्हायला लागला होता.
लोकांनी any good news हा प्रश्न विचारायचं सोडून आता अबोली वांझ आहे आणि समीरचे दुसरे लग्न करा असं समीरच्या घरच्यांना सुचवायला सुरु केलं होतं.
नातेवाईकांच्या अश्या बोलण्याला अबोली आणि तिच्या घरचे कंटाळले होते.नातेवाईक आले की समीर घरातून बाहेर जात असे.घरामध्ये आता हसते खेळते वातावरण नव्हते..... होते ते तणावपूर्ण वातावरण.समीर च्या आई वर हॅमरिंग इफेक्ट झाला होता.त्यामुळे तिने तर समीर अबोलीच्या नकळत वधू संशोधन सुरु ही केले होते.
समीर आणि अबोली खूप डिस्टर्ब झालेले दिसत होते. त्या दोघांचे मन कुठेही लागत नव्हते.समीरला त्याची आई पुन्हा लग्नासाठी तगादा लावत होती.त्याला सारखं म्हणायची आपल्याला वारस हवा ना.
समीरला हे काही पटत नव्हतं... तो सतत तणावाखाली असायचा.
अबोली तर त्याला एकदा म्हणाली देखील... करून टाक एकदाचे दुसरे लग्न.... मग समीर म्हणाला अगं कुणी काही म्हणालं तरी 25% दोष माझ्यातही आहे ना.होईल सर्व ठीक.... खरं तर समीर मनातून हताश व्हायचा.... पण अबोली समोर तसे दाखवत नसे.
अबोली हळू हळू अबोल बनायला लागली होती.कुणातही मिसळत नसे. नियमित आईवडिलांना भेटणारी अबोली आता क्वचितच भेटायला लागली.नौकरीच्या ठिकाणी कामाव्यतिरिक्त ती काहीच बोलत नव्हती.... पूर्णपणे डिप्रेशन मध्ये चालली होती.
अबोली ऑफिस सुटल्यावर एका ऑटोरिक्षा मध्ये घरी जायला निघाली कारण बससाठी तिला थांबावे वाटले नाही..... ऑटो वाल्याने गाणे लावले..... गाणं लागलं... हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया. जिसने तुझको जनम दिया के जिसने तुझको पाला.
गाणं ऐकून एकदम अबोलीचे डोळे चमकले. आपण असा विचार आधी का नाही केला? ... आजच समीरशी बोलू... तिने ऑटोतूनच समीरला फोन लावला. कुठे आहेस तू?
समीर :निघत आहे ऑफिसमधून थोडया वेळात पोहोचेल.
अबोली आता बेचैन झाली होती. समीरला कधी भेटू आणि कधी सांगू असे झाले होते.
समीर घरी आला.... आज खूप दिवसांनी अबोलीने समीरचे हसून स्वागत केले. समीरला अबोलीमध्ये सकारात्मक बदल जाणवला.
समीर फ्रेश झाल्यावर अबोलीने विषय छेडला..... आपण एक मूल दत्तक घेऊया का?
समीर ने थोडासा विचार केला माझी हरकत नाही पण आई बाबा चा विचार घ्यायला हवा मी बोलतो आई बाबाशी.
समीरने त्याचे आईबाबा हॉल मध्ये बसलेले असताना मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव त्याने त्यांच्या जवळ मांडला.
हे ऐकून जवळ जवळ समीरची आई खूप चिडली.. म्हणाली कसं शक्य आहे त्या परक्या मुलाची जात माहिती नसणार आणि कुळ माहिती नसणार असं मूल आपल्या घरात येणार.... मला ते बिलकुल चालणार नाही.
पण आई मी आणि अबोली पण वेगळ्या जातीचे ना लग्नाच्या वेळेस तू ना जात बघितली ना कुळ... असं समीर म्हणाला.
त्यावर त्याची आई म्हणाली अरे तिच्यावर संस्कार चांगले झालेले होते.
आता समीरला काय बोलावे हे सुचेनासे झाले.... ठीक आहे आई झोपायला जातो मी असे म्हणत समीर बेडरूमकडे वळाला. अबोलीचा रडवेला चेहरा पाहून त्याने ओळखून घेतले की तिने त्याचे आणि आईचे बोलने ऐकले होते.
काय करावे समीर एकदम हतबल झाला होता.कारण मूल दत्तक घेणे हे त्यालाही पटलेले होते.
दुसरा दिवस उजाडला समीर आणि अबोली रात्रभर एकेकटे विचार करत होते म्हणून दोघांनाही अगदीच पहाटे झोप लागली. थोडया वेळाने समीर उठला पण अबोली मात्र उठली नाही. तिला उठावेच वाटत नव्हते.... जणू काही तिच्या जगण्याची उमेद संपली होती..... आता अबोलीला जगावेसे वाटत नव्हते. ती होती नव्हती तेव्हडी डिप्रेशनमध्ये गेली होती.
पहिल्या दिवशी समीरला वाटले कामाचा कंटाळा आला असेल.... म्हणून ती उठली नसेल.... पण आता हे रोजचेच झाले होते. अबोली पूर्ण आजारी असल्यासारखी दिसत होती. तिला कसलाच उत्साह राहीला नव्हता.सगळ्या तज्ञ डॉक्टरांना दाखवून झाले..... रिपोर्ट्स नेहमीच नॉर्मल येत.
शेवटी समीरने अबोलीला मानसोपचार तज्ञाकडे नेले.तिथे मानसोपचारतज्ञाने देखील मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला. आता समीर ने त्याच्या आईला ठणकावून सांगितले.... एक तर मी दुसरे लग्न करणार नाही आणि आम्हाला दोघांनाही मूल दत्तक घ्यायचं आहे... अबोलीचे झालेले हाल पाहून आणि समीरचे रौद्र रूप पाहून समीरच्या आईने मूल दत्तक घेण्यासाठी होकार दिला.... बाबा आधीही विरोधात नव्हते पण त्याच्या आईने काही बोलूच दिले नव्हते.
मग समीर आणि अबोली पुढील procedure करण्यासाठी एका अनाथ आश्रमात गेले. दोघेही ऑफिस मध्ये बसले असता काही मुलांचा घोळका तिथून जात होता. अबोली त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याशी बोलायला लागली दहा मिनिटातच तेथील मुले तिला ताई, ताई करायला लागले.
इकडे समीर ने अर्ज करण्यासाठी माहिती काढली........ तेव्हा कळाले अर्ज ऑनलाईन करावा लागतो आणि तो केल्यावर मूल मिळण्यासाठी वर्ष दीड वर्ष लागू शकते कारण आता मूल दत्तक घेण्याची संख्या वाढली आहे.
अबोली मुलांना भेटून एकदम फ्रेश झाली होती. जणू काही तिला कुठलाच मानसिक आजारही झाला नव्हता.
अबोलीने ठरवले आपलं मूल घरी येईपर्यंत आपण आठवड्यातून एकदा तरी इथे यायचं.... खरं तर ती ट्रीटमेंट होती अबोलीच्या मानसिक आजारावर...
मुलांना नेहमी नेहमी भेटून अबोलीने पुन्हा विचार केला आपण अनाथ आश्रम काढले तर आपल्याला किती तरी मुले भेटतील.... आई बाबा मान्यता देतील का? अबोलीने हा विषय समीर समोरही मांडला.
समीर :त्यांना अभिमान वाटेल..... पण अगं पण त्यासाठी जागा लागेल ना
अबोली :आई पप्पा कडे बाजूलाच दोन पडीक रूम आहेत तिथे डागडुजी करून सुरु करू..... तू कृपा करून या आश्रमातून कागदपत्रांची पूर्तता कशी करायची ते बघ ना.
लवकरच दोघांनी मिळून आई नावाचा अनाथ आश्रम सुरु केला आता ती एक नाही तब्बल बारा मुलांची आई झाली होती आणि तिचे तिसरे स्वप्नही(समाजासाठी काहीतरी करण्याचे ) दोघांनी मिळून पूर्ण केले.
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©®डॉ.सुजाता कुटे

0 टिप्पण्या