"त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहीला मी "

दुपारी 3 ची वेळ होती. जानवी एक पॉवर नॅप घेण्याच्या विचारात असताना दरवाजाची कडी वाजली.जानवी ने दरवाजा उघडला. एक साधारण 65 वर्षांचे गृहस्थ, सफारी घातलेले आणी त्यांच्यासोबत 18 वर्षांची गोरी गोमटी देखणी निरागस भाव असलेली तरुणी, उभे होते
नमस्कार मी डॉ. मोहन आणी ही माझी अर्धांगिनी मीनल,अशी त्यांनी ओळख सांगितली.जानवी एकदम स्तब्ध होऊन मीनल कडे बघत राहिली. तिच्या मनातील गोंधळ हा डॉ. मोहन यांनी बरोबर हेरला. ही माझी दुसरी पत्नी आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
"मी तुमच्या शेजारीच राहण्यासाठी आलो आहे. "म्हटलं तुमची ओळख करून घ्यावी म्हणून तुमच्याकडे आलो.असं डॉ. मोहन म्हणाले.
चहापाणी झाल्यावर त्यांनी रजा घेतली आणी ते निघून गेले. जानवी मात्र त्या विजोड जोडप्याकडे बघून पुरती गोंधळलेली होती.ते खरच नवराबायको होते ना, असा विचारही तिच्या मनात क्षणभर आला. जाऊदे आपल्याला काय करायचं असं पुटपुटून ती पुन्हा पॉवर नॅप साठी बेडरूम कडे वळाली.
संपूर्ण कॉलनी मध्ये डॉ मोहन आणी मीनल विषयी चर्चा सुरु होती. त्यांच्या विजोड जोडप्याचे सगळ्यांना नवल वाटत होते. सगळीकडे त्यांचीच चर्चा. मग जानवी ला कामवाल्या मंगल कडून समजले....
"डॉ मोहन चे दुसरे लग्न, पहिली बायको आणी मुले पुण्यात राहत होते पाहिली बायको वयस्कर तिला स्वयंपाक वगैरे करणे होत नव्हते म्हणून त्याने मीनल शी लग्न केले होते. "
मीनल च्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यांनी चक्क मीनल ला विकले होते. तेही अगदी 65 वर्षांच्या डॉ मोहन ला......

"पैसा पण आणी मुलीचे लग्न पण "हे ऐकून जानवी मात्र सुन्न झाली होती. मीनल चा निरागस चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
मीनल खरोखरच शांत, अबोल, सय्यमी,समजूतदार अशीच होती. सुरुवातीला डॉ. मोहन, मीनल ला दारू पिउन खूप मारहाण करायचा. पण तिच्या निरागसतेपुढे मोहन च्या रानटीपणाने मात खाल्ली. आता तो मीनलची काळजी घेत होता. तीला काय हवे काय नको ते सर्व बघत होता. मीनल पण ह्या सगळ्यांमध्ये खूप खूष होती. कदाचीत तिने खूप गरीबी पाहिली होती. म्हणून तिची कसलीही तक्रार नव्हती.
मीनल ला सुनीता नावाची एक सुंदर बहीण होती. मीनलचा सुखी संसार पाहून मीनलच्या आईवडिलांनी आता सुनीता चे सुद्धा असेच लग्न करायचे ठरवले.
डॉ मोहन च्या ओळखीने सुनीता साठी एक स्थळ आले. 2 लाख सौदा ठरला. लग्न घरीच चारचौघांमध्ये करण्याचे ठरले. आधीच एक मुलगी असलेला राजविंदर हा वर होता. राजविंदर विदुर होता असे सांगण्यात आले होते.
लग्न झाले. अगदी डॉ मोहन च्या घरामध्ये बाकी कुणालाही आमंत्रण नाही. डॉ मोहन, मीनल आणी तिचे आईवडील बस इतकेच.
"लग्न होऊन सुनीता पंजाबला गेली."
इकडे मीनल आता सुनीताच्या फोन ची वाट पाहात होती. सुनीता ने फोन केला, ती जरा घाबरलेली होती, मीनल ला सांगत होती. की हे राजविंदर चे तिसरे लग्न आहे. दुसरी बायको जिवंत असून ती फक्त रुसून माहेरी गेली आहे. सुनीताला खूप मारहाण ही होत होती.तिच्या कडून खूप काम करून घेत होते. तिला जेवण पण बरोबर देत नसत, तिचा अतोनात छळ होत होता. पण मीनल फोन वर ऐकण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हती.
आणी आता तर सुनीताचा फोन बंद येत होता. तोही कायमचा..............
मीनल ला सुनीता बद्दल काहीच बातमी मिळत नव्हती, संपर्क तुटला तो कायमचाच........
मीनल जानवी जवळ हे सर्व रडून सांगत होती. पण अश्या वेळी जानवी ला मीनलला धीर देण्याशिवाय पर्याय नव्हता......

"बोली हज़ारो से लाखो में लगा दी..
आज हस्ते हस्ते एक रूह फिर रुस्वा हो गई...."

डॉ. सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या