"अनोखे पालकत्व "

"सुमित" साधारण अकरा वर्षांचा असेल, सतत हसमुख चेहरा त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की एक सकारात्मक तेज असल्या सारखं वाटायचं... 

त्याला ना इतर मुलांसारखी मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती ना तो इतर मुलांसारखा हट्टी होता....  

पण सुमित एका अश्या वडिलांचा मुलगा होता जे आमच्या रुग्णालयातील नियमित रुग्ण होते.. त्यांचं नाव होतं पांडुरंग.. 

पांडुरंगला किडनीचा आजार झालेला होता.. त्या आजारामध्ये त्याच्या दोन्ही किडन्या जवळ जवळ निकामीच झालेल्या होत्या.... त्यामुळे आता तो डायलिसिस वर होता (या प्रक्रियेमध्ये रक्त शुद्ध केले जाते, जे काम किडनी करत असतात पण जेव्हा त्या निकामी व्हायला लागतात ) .... सहाजिकच पांडुरंगला दर आठवड्याला त्याला डायलिसिस साठी यावे लागत असे.... 

त्या रुग्णांना ऍडमिट आमच्या अपघात विभातून करावे लागत असे... त्यामुळे तिथे अपघात विभागात असताना मी या रुग्णांच्या ऍडमिशन प्रक्रियेचे निरीक्षण करत असे.... 

पांडुरंगला ऍडमिट करायला कुठलीही मोठी व्यक्ती सोबत न येता सुमित त्याच्या सोबत एक जबाबदार व्यक्ती म्हणून येत असे.... 

मला ते पाहून सुमितचे खूप कौतुक वाटायचे... सुमित सारखीच अजून दहा ते बारा वयोगटातील दोन ते तीन मुले...

 कुणी आपल्या आजी सोबत तर कुणी आपल्या आजोबा सोबत येत असे.... 

एक दिवस पांडुरंगची तब्येत बिघडली..... तो सिरिअस झाल्याने त्याला अपघात विभागात आणल्या गेलं.... त्याच्यावर उपचार केले गेले आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आली..... पण या सगळ्या दरम्यान त्याच्या सोबत फक्त सुमित हजर होता.... पांडुरंगचा पालक म्हणून.... जबाबदार व्यक्ती म्हणून.... 

इतकेच नव्हे तर सुमित त्याच्या वडिलांची भरपूर सेवा करत असे.... वडिलांना जे पाहिजे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असे.... 

 पांडुरंग मात्र सुमितला प्रसंगी शिव्या ही देत असे.... दर अर्ध्या तासाला पांडुरंग सुमितला व्हील चेअर आणायला सांगत असे आणि मला इकडे घेऊन चल तिकडे घेऊन चल असे करत असे.... 

सुमित ते देखील आनंदाने करत असे.... थकत नसे..... पण हे करत असताना पांडुरंगने सुमितला काहीतरी खाण्यास मागितले.... त्याला ते द्यायला उशीर झाला म्हणून पांडुरंगने सुमितला आमच्या समोरच... "नालायक " अशी शिवी हासडली..... 

सुमितला तशी त्याच्या वडिलांच्या शिव्या ऐकण्याची सवय होती... पण कदाचित त्याच्या वडिलांनी माझ्यासमोर शिवी दिल्याने तो दुखावला गेला.... त्याचे डोळे पाणावले... ते माझ्या नजरेतून सुटले नाही.. 

पांडुरंगला आता वॉर्ड मध्ये शिफ्ट केले.... थोड्याच वेळाने सुमित अपघात विभागा समोरून जात असताना मी त्याला हाक मारली..... मला सुमितबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.... 

मी सुमितला विचारले काय रे तू कुठल्या वर्गात आहेस?? 

सुमित :सहावी 

मी :तूझ्या बाबांसोबत कुणी मोठं माणूस का येत नाही?? नेहमी तूच दिसतोस.... 

सुमित :कोण येणार मॅडम?? आमच्या घरी माझी आई आणि दोन लहान भावंडे राहतात.... माझ्या बाबांचा आजार असा आहे की त्यांना सतत दवाखान्यात आणावे लागते.... इतक्या वेळेस कोण आणणार?? 

मी : अरे पण तुझी आई मला एकदाही दिसली नाही बाबांसोबत... तूच दिसतोस नेहमी.... 

सुमित : आई लोकांची धुनी भांडी करते.... ती काम करते म्हणून आमचं घर चालतं.... जर ती इथे आली तर आम्ही काय खाणार??

मी :अच्छा!तूला राग नाही येत का?? तूझे बाबा तुझ्यावर किती ओरडतात? 

सुमित : माझे बाबा आधी असे नव्हते.... पण आजारी झाल्यावर असे झाले...... सुरवातीला खूप राग यायचा पण काय करणार त्यांच्या बिमारीचा त्यांना खूप त्रास होतो... कधी कधी खूप दुखतं...मग ते असे चिडतात 

मी : तुझी शाळा?? 

सुमित :दवाखान्यात आलो की शाळेला सुट्टी... 

मी :मग तुझा अभ्यास?? 

सुमित :माझे काही शिक्षक खूप चांगले आहेत...ज्या दिवशी मी दवाखान्यात आलो.... त्या दिवशी काय शिकवले ते मला जमेल तसे सांगतात....

मी :असं आहे तर.... 

सुमित :चला बाबा पुन्हा चिडतील.... येतो मी मॅडम... म्हणून सुमितने तिथून रजा घेतली... 

मी मात्र स्तब्ध झाले होते... सुमितच्या पालकत्वाला बघून... परिस्थितीने त्याला इतक्या लहान वयात खूप समजूतदार बनवले होते...सुमितचे आणि त्यांच्यासारख्याच अजून येणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचे वाईटही वाटत होते... 

अश्या अनोख्या पालकत्वाला माझा सलाम... 

लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा.... 

©®डॉ सुजाता कुटे 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या