एक सदगृहस्थ होते,साधारण त्यांचं वय सत्तर च्या आसपास असेल....
त्यांचा पेहराव म्हणजे धोतर, कुर्ता आणि फेटा.... कपडे अगदी वॉशिंग पावडर निरमा च्या जाहिराती सारखे स्वच्छ असत... त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं..
आमच्या बाह्य रुग्ण विभागात दम्याची बिमारी झाली म्हणून नियमित येत असत....
कधी कधी दमा जास्त झाला की त्यांना ऍडमिट देखील करावे लागत असे.. त्यांना मुलगा नव्हता... त्यांची मुलगीच त्यांना घेऊन येत असे...
त्यांची मुलगी ही लोकांची धुनी भांडी करून आपला उदर निर्वाह करत असे... आणि तरी देखील जमेल तशी जीव तोडून आपल्या वडिलांची सेवा करत असे...
जेव्हा जेव्हा हे आजोबा आमच्या ओ.पी. डी. मध्ये येत असत तेव्हा तेव्हा तिथे बसलेल्या सगळ्याच डॉक्टरची ख्याली खुशाली विचारत असत, सर्वांशी प्रेमाने बोलत असत. त्यामुळे ते आले की त्यांना प्रत्येक डॉक्टर आवाज देऊन त्यांचे नियमित मेडिसिन लिहून देत असत....
माझी तर त्यांच्याशी खूप चांगली ओळख झालेली होती... त्यांच्या मुलींविषयी माझ्याजवळ ते बऱ्याचदा कृतज्ञता व्यक्त करत असत..
मला म्हणत असत मला मुलगा असता तरी त्याने इतकी काळजी घेतली नसती... पण माझी मुलगी अश्या गरीब परिस्थितीत देखील माझी खूप काळजी घेते....
एक गंम्मत सांगू का?? जावयाचे पण काही चालू देत नाही.... मी ते ऐकून खूप हसले होते.. ... आणि म्हणाले आजोबा ती तुमचीच मुलगी आहे ना... तुमच्यासारखीच असणार आणि तिचंही कर्तव्य आहे ना तुमची काळजी घेणं... ते ऐकून त्यांचे डोळे पाणावले आणि म्हणाले डॉक्टरीन बाई चांगल्या गोळ्या द्या ना... दमा कायम पळून जाईल....
मग मी म्हणाले आजोबा तुम्हाला तर माहीतीना या गोळया तुम्हाला कायमस्वरूपी घ्याव्या लागणार... तूम्ही बिनधास्त येत जा... प्रत्येकवेळी मुलीने येण्याची गरज नाही... असं बोलून ते आजोबा मेडिकल घेण्यासाठी निघून गेले...
एक दिवस अचानक त्या आजोबांना खूप सिरीयस अवस्थेत आमच्या अपघात विभागात आणले गेले...
योगायोगाने माझी ड्युटी तिथेच होती.... आजोबांवर लागलीच उपचार केले गेले... आणि वेळेवर उपचार झाल्याने त्यांची प्रकृती धोकयाबाहेर आली... दोन ते तीन दिवस ऍडमिट राहून आता ते पूर्ण पणे ठणठणीत झाले... त्यांना डिस्चार्ज दिला गेला...
घरी जाता जाता त्या आजोबांच्या मनात काय आले कोण जाणे ते आम्हा सर्व डॉक्टर मंडळीना ओ.पी. डी. मध्ये भेटायला आले... आणि माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले डॉक्टरीन बाई तुम्ही आणि इथले सगळे डॉक्टर माझी नेहमीच काळजी घेतात म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना चहा पाजू इच्छित आहे... असे म्हणून त्यांनी सगळ्यासाठी चहा मागितला.... आणि सगळ्यांना चहा पाजून धन्यवाद म्हणून ते तिथून निघून गेले...
दहा एक दिवसांनी माझी त्यांच्या मुलीची भेट झाली तेव्हा मला तीने सांगितले की इथून गेल्यावर दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले.... मी तर ते ऐकून एकदम स्तब्ध झाले... असं कसं मला तर विश्वासच बसत नव्हता..
जाता जाता ते आम्हाला चहारुपी एक समाधानी आशीर्वाद देऊन गेले होते.....
शेवटचं धन्यवाद म्हणून गेले होते... जणू काही त्यांना त्यांचा शेवट आलेला कळाला होता.... आणि ते जाण्यापूर्वी आभार व्यक्त करण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती
मी मनामध्ये आजोबांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करत होते....
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©®डॉ सुजाता कुटे
0 टिप्पण्या