मला भेटलेला जॉन

आजकाल इतक्या भयंकर भयंकर घटना घडत आहेत आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी काहीच सुरक्षित असं वाटत नाही....
 त्यांना कुठे दूर पाठवायचं असलं तरी देखील अनोळखी ऑटो रिक्षाने पाठवणे देखील धोक्याचे वाटत आहे... 
ट्रॅक करता येणारी ओला असो की उबेर, सोबत सेलफोन असूनही प्रत्येक आईवडिलांना मूल घरी येईपर्यंत एक धाकधूकच असते...
पण एक काळ असा होता की त्यावेळेस ना पालकांना कुठले भय असायचे आणि न कुठले गॅझेट हजर होते. ना कुठले सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध होते... 
साधारण मी सातवीत असेन 1988/89 चा काळ... ...माझे वडील डॉक्टर असल्या कारणाने आम्ही पाणचक्कीच्या डॉक्टर्स क्वार्टर्स मध्ये राहायचो....
 त्या वेळेस माझी शाळा म्हणजे बाल ज्ञान मंदिर खडकेश्वर औरंगाबाद ही होती... 
माझे शाळेत येणे जाणे म्हणजे कधी पायी तर कधी सिटी बस ने असायचे... 
माझ्या शाळेची वेळ ही दुपारी बारा ते संध्याकाळी पाच असायची.... 
शाळा सुटल्यावर खडकेश्वर चे एक बस स्टॉप होते तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी जायचो आणि तिथून आपापल्या स्टॉप च्या बस मध्ये बसून आपल्या घरी जायचो.... 
मला घरी जाताना विद्यापीठ(बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ ) बस पकडावी लागे. ती पण पाणचक्की मार्गे... 
मी बस ची वाट पहात होते...
 बस काही येण्याचे नाव घेईना...
माझ्या सगळ्या मैत्रिणी आपापल्या बस मध्ये बसून घरी गेल्या... मी मात्र एकटी राहीले... 
आता अंधार पडायला लागला... 
मला खूप भीती वाटायला लागली.... 
तितक्यात एक अंदाजे सत्तावीस वर्ष वय असणारा तरुण माझ्या जवळ आला...मला काय झाले?? म्हणून विचारायला लागला..... मी त्याला माझी बस आली नाही आता पायीच घरी जायला निघते असे त्याला सांगितले.... 

तेवढ्यात तो म्हणाला तूला पाणचक्की क्वार्टर्स ला जायचे आहे ना मी सोडतो... तू फक्त दहा मिनिटे थांब... (बिबिका मकबरा/छावणी  )ची बस येईल तिने मी तूला सोडतो...

 नवीन रूट सांगतो.... मी गोंधळले... हो नाही करत थांबले.... बोलता बोलता त्याने मला त्याचे नाव जॉन सांगितले.... मी पण माझे नाव सांगितले.... आणि तितक्यात बस आली.... आम्ही दोघेही बस मध्ये बसलो.... मला थोडंसं हायेसे वाटले.... वाटलं चला निघालो एकदाचे घराकडे.... 
बसने प्रवास सुरु झाला सुरुवातीला काही ओळखीचे स्टॉप होते तोपर्यंत काही वाटले नाही....
 पण अचानक काही अनोळखी रस्ते दिसायला लागले... अनोळखी स्टॉप दिसायला लागले... 
आता मात्र माझे धाबे दणाणले..... आपलं काही खरं नाही असंच वाटायला लागलं.... आपन किडनॅप तर होणार नाहीना याची भीती वाटायला लागली.... माझ्या चेहऱ्यावरची भीती जॉनला दिसू नये म्हणून मी उगाच बसच्या खिडकीबाहेर बघत होते.... काही ओळखीचं दिसतंय का हे ही बघत होते... 
माझी अशी भीती साधारण दहा मिनिट चालली असेल.... तितक्यात मला विद्यापीठ गेट दिसले.... जीवात जीव आला.... आता आपण योग्य मार्गावर आहोत याची जाणीव झाली.... 
पाणचक्की च्या मागच्या साईड ने बस थांबली...... मी जॉन ला म्हणाले मी उतरते..... रस्ता आता माझ्या लक्षात आला आहे....
 तर जॉन मला म्हणाला तू तूझ्या घरी जाईपर्यंत माझी जबाबदारी आहे... मी तूला असा बरं सोडेन.... 
मग जॉन सुद्धा बस मधून उतरला.... आणि आम्ही क्वार्टर्सच्या दिशेने चालू लागलो... चालता चालता तो मला म्हणाला तू तर मला विसरून जाशील.... नंतर ओळखणारही नाहीस... मी म्हणाले मी तूला तूझ्या गळ्यातल्या क्रॉस वरून ओळखेन... मग तो मला म्हणाला मी कसं ओळखू... मी म्हणाले माझ्या गळ्यावरच्या तिळाने....
तितक्यात माझं घर आलं... मला माझ्या आईवडिलांनी रागावू नये म्हणून तो काही मध्ये आला नाही... पण मला मी घरी व्यवस्थित पोहोचले हे त्याला माझ्या घरातील गॅलरीमध्ये मी जाऊन हात दाखवला तेव्हाच तो तिथून निघून गेला..... 

खरंच किती मूर्ख होते मी... ज्याने मला इतकं सुरक्षित घरी पोहोचवलं त्याला मी घरी पण नाही बोलावलं.... 
मी माझ्या मम्मी ला जॉन बद्दल घाबरत घाबरत सांगितलं... तर मम्मी म्हणाली अगं त्याला घरी तर बोलवायचं असतंस ना..... त्याने तूला इतकं व्यवस्थित घरी सोडलं ते.... 

मग मला मात्र अस्वस्थ वाटायला लागलं.... अरे आपण घरी बोलावलं असतं तर चांगलं झालं असतं. 
योगायोगाने चार पाच वर्षाने त्याच स्टॉप वर आमची भेट झाली... अगोदर त्याने ओळखले नी माझ्या नावाने हाक मारली.... मग मी त्याचा क्रॉस बघून अंदाजा बांधला... किती भोळी होतेना मी प्रत्येक ख्रिस्चन व्यक्तीच्या गळ्यात क्रॉस असते हेच मला माहिती नव्हतं.... 
आजकालचे वातावरण बघता खरंच जॉनसारखी माणसे मिळणं दुर्मिळच... 
या लेखाद्वारे तू जिथे कुठे असशील... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद  तूला 
लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा. 
©® डॉ. सुजाता कुटे. 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या