प्रसूती रोग विभागाची नियमित ओ. पी. डी. चालू होते...
तिथे गरोदर महिलांची नियमित तपासणी चालू होती...
तितक्यात एक नऊवारी साडी नेसलेली महिला तिच्या अंध मुलीला तपासण्यासाठी घेऊन आली होती....
माझा एक वीक पॉईंट आहे की कुठल्याही व्यक्तीचा चेहरा मला एका भेटीत कधीच लक्षात राहत नाही....
पण ती नऊवारी साडी नेसलेली स्त्री जरी साठीच्या आसपास असेल तरी दिसायला खूप सुंदर होती आणि एक वेगळेच तेज देखील तिच्या चेहऱ्यावर होते....
त्यामुळे ती चांगलीच लक्षात राहिली.....
तिच्या मुलीला मी तपासले....
आमच्या भाषेत ती खूप पेल दिसत होती.... म्हणजेच पांढरी फटक दिसत होती... पाहिल्या पहिल्याच असं लक्षात येत होत की ती खूप अनेमिक आहे....
ती मुलगी पहिल्यांदा गरोदर होती... आणि तिला नववा महिना लागायला फक्त पंधरा दिवस बाकी होते...... तिला पूर्ण तपासले असता तपासणी मध्ये तीचे बाळ पायाळू असल्याचे लक्षात आले.... एकंदर असं लक्षात आलं होतं की तिच्या प्रसूतीची वाटचाल ही सीझर कडे चालली आहे..... सीझर म्हटलं तर तिचं हिमोग्लोबीन 10gm%पाहीजे.....
त्या नऊवारी नेसलेल्या स्त्रीला मी तिच्या मुलीचे रक्त तपासून घेण्यास सांगितले....
तीचे हिमोग्लोबीन फक्त 6 gm% होते... त्यामुळे तिला कमीत कमी 3 ते चार रक्ताच्या लागणार होत्या....
वेळ असल्याने तिला ऍडमिट करून तिला एका दिवसाआड रक्त चढवले गेले....
सर्व उपचार झाल्यावर तिला घरी पाठवण्यात आले....मग पंधरा ते वीस दिवसांनी ती नऊवारी घातलेली स्त्री तिच्या अंध मुलीला प्रसूतीकळा येत आहेत म्हणून घेऊन आली....
आल्या आल्या मी तीला तपासले तेव्हा लक्षात आले की अजूनही तीचे बाळ पायाळू आहे...
म्हणजे सीझर शिवाय पर्यायही नाही असे लक्षात आले... (प्रथम प्रसूती मध्ये बाळ जर पायाळू असेल तर नॉर्मल डिलेव्हरी मध्ये बाळाचे डोके लवकर डिलेव्हरी झाले नाही तर बाळ गुदमरून मरू शकते... त्यामुळे सीझर हाच पर्याय योग्य आहे )
सीझरची सगळी तयारी केली आणि तिला ऑपेरेशन थेटर मध्ये शिफ्ट केले....
सीझर सुरु केले.... तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला... बाळाचे वजन 3.5 kg भरले....
क्लोजर सुरु केले...
क्लोजर करताना एक गोष्ट लक्षात आली की तीचा गर्भपिशवीचा आकार हा नॉर्मलपेक्षा वेगळा होता...
गर्भपिशवीचा डावा भाग हा छोटा होता.... आणि हेच तिचं बाळ पायाळू असण्याचं कारण होतं....
तो छोटा भाग कमजोर देखील होता... अचानक त्यातून भडाभडा रक्तस्त्राव सुरु झाला..... त्या भागाला दाबून ठेवलं की तात्पुरता रक्तस्राव थांबत असे पण तो सोडला की त्याच स्पीडने रक्तस्त्राव होत होता..... फक्त एक गोष्ट चांगली होती की तीचे बी.पी. डिस्टर्ब नाही झाले....
आता मात्र सर्जनची मदत घेणे जरुरीचे होते.... पण तेथील सर्जन सुट्टीवर होते....
मग असिस्टंट डॉक्टरने गावातील नामांकित सर्जन आणि स्त्रीरोग तज्ज्ञाला मदतीला बोलावले.... मी तोपर्यंत गर्भपिशवीचा तो भाग पकडून ठेवला.... सर्जन आणि स्त्रीरोग तज्ञ खरं तर प्रायवेट प्रॅक्टिशनर होते.... पण कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता ते दोघेही सरकारी रुग्णालयात पाच मिनटात हजर झाले.... सर्जनने होणारा रक्तस्त्राव बघताच गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घेतला..... तिच्या घरच्यांना परिस्थितीची कल्पना देऊन गर्भपिशवी काढण्यात आली.... रक्ताच्या पून्हा तीन बॅग लागल्या आणि त्या मुलीचा जीव वाचला.... आम्हा सहा डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला.... कारण त्या वेळी दोन भूलतज्ञ हजर राहीले होते....
मला मात्र पहिल्याच मुलीच्या वेळी तिने गर्भपिशवी गमावल्याचे दुःख होत होते.... पण तीची आई आणि एका डोळ्याने अंध असणारा त्या मुलीचा नवरा हे मात्र समाधानी वाटत होते...
नंतर तिसऱ्या दिवशी माझ्या राउंडच्या वेळी तिचं बाळ खूप रडत होतं..... त्या अंध मुलीची आई काहीतरी कामानिमित्त वॉर्डच्या बाहेर गेलेली होती.... मी बघितलं तर त्या मुलीला तिच्या बाळाला घेता येत नव्हते... मी मग उचलून बाळ तिच्याजवळ दिले..... तेव्हा मात्र मला दोन गोष्टींचा साक्षात्कार झाला
एक तर देव तारी त्याला कोण मारी कारण ऐनवेळी बाहेरचे डॉक्टर्स तिच्यासाठी हजर झाले आणि दुसरा हा की निसर्ग खरंच ग्रेट आहे.... त्या गोंडस बाळाची आता ते दोघे म्हणजे ती पूर्णतः अंध आणि तीचा नवरा एका डोळ्याने अंध मिळून त्या एकुलत्या एक बाळाची व्यवस्थित काळजी घेतील.....
©® डॉ सुजाता कुटे.
0 टिप्पण्या