लग्नानंतर तब्बल सतरा वर्षानंतर सुनयनाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता....
तिच्या त्या निर्णयावर सगळेच नाखूष होते...
सुनयनाच्या माहेरचे लोक तर सुनयनाला नातं तोडून टाकण्याची धमकी देत होते...
सासरच्यांनी तर सुनयनाची खूप बदनामी करायला सुरुवात केली होती...
सुनयनाच्या बहिणी आणि बहिणीच्या सासरचे देखील सुनयनाची समजूत घालत होते....
सुनयनाच्या बहिणी तीला म्हणत होत्या की अगं तू घटस्फोट घेतला तर आम्हाला देखील आमच्या सासरचे टोमणे मारतील
पण सुनयना देखील आपल्या निर्णयावर ठाम होती...ती कुणाचेही ऐकायला तयार नव्हती...
सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सुनयना जणू अपराधी होती...
सुनयना नावाप्रमाणेच दिसायला खूप सुंदर होती....
सुनयनाला अजून चार बहिणी होत्या.... त्यात सुनयना सगळ्यात मोठी बहीण होती.....
सुनयनाची आई गृहिणी तर वडील जिल्हा परिषद मध्ये क्लर्क होते....
त्यांच्या तूटपुंजा पगारात सगळे घर चालत होते....
सुनयना दिसायला सुंदर असल्याने तिला बारावीत असतानाच स्थळ यायला सुरु झाले होते...
पाच मूली असल्याने सुनयनाच्या वडिलांनी तीचे लग्न करण्याचे ठरवले....
त्याच वेळी त्यांच्या ऑफिस मधील दुसऱ्या विभागातील क्लार्कच्या मुलाचे महेशचे स्थळ आले....
महेश जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभागात इंजिनिअर होता... त्याची पगार देखील बऱ्यापैकी होती....
महेशने सुनयनाला जिल्हा परिषद मध्येच पाहिलं होतं.... ती तिच्या वडिलांसाठी डब्बा घेऊन आली होती...
तेव्हा पासून महेशने त्याच्या वडिलांजवळ मला सुनयनाशीच लग्न करायचं आहे असा तगादा लावला होता.....
शेवटी त्यांनीच महेशचे स्थळ सुनयनासाठी पाठवले होते...
सुनयनाच्या वडिलांनी जास्तकाही विचारपूस न करता सुनयनाचे लग्न महेश सोबत लाऊन दिले....
खरं तर सुनयनाला तीचे शिक्षण पूर्ण करायचे होते....
पण सुनयनाच्या वडिलांनी त्यांची सगळी परिस्थिती सुनयनाला सांगितली.... त्यामुळे ती लग्नाला तयार झाली होती....
सुनयनाचे लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस संपले आणि आता सुनयनाला महेशचं खरं रूप कळायला लागलं...
सुनयना सुंदर असल्याने महेश सतत संशय घेत असे.... त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील कुठल्याही पुरुषाशी बोलताना सुनयनाचा जीव घाबराघुबरा होत असे... ती सतत एका दबावाखाली रहात असे...
पण ज्या परिस्थितीत तीचे लग्न झाले होते सुनयना माहेरी देखील सांगू शकत नव्हती.... त्यात जर सुनयना काही वेडी वाकडी वागली तर त्याचा परिणाम बहिणींवर होईल असा विचार करून एकटीच रडत बसायची.....
महेश समोर महेशच्या आई वडिलांचे देखील काही चालत नसे...
त्यातच महेशची बदली दुसऱ्या शहरात झाली.... महेश सुनयनाला घेऊन दुसऱ्या शहरात गेला तिथे ते दोघेच होते.....
त्यात सुनयनाला दिवस गेले... सुनयनाला वाटले की बाळ झालं की आपोआपच महेश सुधारेल....
पण झाले उलटेच दिवसेंदिवस महेश घरी कमी आणि बाहेर जास्त राहू लागला अलीकडेच त्याला दारूचं व्यसन लागलं होतं....
घरी असल्यावर महेश सुनयनाला शिव्या देत असे मारहाण करत असे.... घरी कुठलेच सामान आणून देत नसे.... सुनयनाला घरखर्चाला पैसे देत नसे.....खूप शिव्या खाल्ल्यानंतर सुनयनाला थोडे पैसे खर्चासाठी मिळत असे.....
या सगळ्या कारणाने सुनयनाचा एक अवतार झाला होता... सुनयनाने तीचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता.....ती सतत नाखूष राहू लागली होती....
त्यात बाळाचा जन्म झाला.... आणि सुनयना बाळाच्या राहुलच्या संगोपनात व्यग्र झाली....
सुनयना कसे बसे दिवस काढत होती.... राहुल जसजसा मोठा होत होता तस तसा घराचा खर्च वाढत होता... घरखर्चासाठी सुनयनाने पैसे मागितले की आधी सुनयनाला शिव्यांची लाखोळी ऐकून घ्यावी लागत असे आणि कधी कधी मारहाण देखील.... आणि मग पैसे मिळत त्यातच ती राहुलच्या शिक्षणाची फीस भरत असे....
हे सर्व सुनयना माहेरच्या लोकांसाठी सहन करत असे....
पण आज... आज स्थिती वेगळी होती.... बहिणींचे लग्न झालेले होते....
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राहुलचे आठवीचे महत्वाचे वर्ष चालू झाले असताना महेशने राहुल ची फीस भरणार नाही असे सुनावले.... त्यातच तीला महेशच्या अफेयर बद्दल देखील कळाले होते.... आणि म्हणून सुनयनाने घटस्फोटाचे पाऊल उचलले आणि ती तिच्या निर्णयावर ठाम होती...
सुनयनाच्या मैत्रीणीने तिच्यासाठी एक फाईव्हस्टार हॉटेल च्या रिसेपशनिस्ट ची नौकरी लाऊन दिली होती....
घटस्फोटाचा निर्णय जेव्हा तीने सगळ्या बहिणी आणि आईवडिलांसमोर मांडला तेव्हा सगळ्यांचा विरोध पाहून सुनयना बोलायला लागली....
मी हे सगळं सहन केलं, का ?? तर माझ्या लहान बहिणींचे लग्न होणार नाही... पण आता तर तूम्ही तुमच्या संसाराला लागल्या आहात विशेष म्हणजे आनंदात आहात....
का! मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही?? माझ्या राहुलला त्याचं शिक्षण चांगल्या शाळेत घेण्याचा अधिकार नाही?? मी सगळ्यात आधी जन्म घेतला यात माझा काय दोष आहे...
तुमच्यासाठी म्हणून मी काय हा त्रास आजन्म सोसायचा... तूम्ही माझ्या जागेवर असतात तर काय केलं असतं?? ... असा सवाल. सुनयनाने आपल्या चारही बहिणींना केला...
आणि म्हणाली... नाही ना उत्तर?? नसणारच कारण तूम्ही तर इतकं सहन केलंच नसतं.... पण आता नाही मी यात राहुलला सफर होऊ देणार नाही...
मी किरायाने सध्या एक रूम केली आहे तिथे राहायला जात आहे... जर तूम्हाला माझं मत पटलं असेल तर तूम्ही मला कधीही भेटायला येऊ शकता....
हे ऐकून सुनयनाच्या वडिलांचे डोळे पाणावले.... बेटा तू तर एकदम परकं करून टाकलस...
तू कधी महेशरावांबद्दल आम्हाला कधीच काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार?? तू आपल्या घरी ये राहायला.... राहुलचं शिक्षण आपण दोघे मिळून पूर्ण करू......
प्रकाशनाचे व वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.... लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा
©® डॉ.सुजाता कुटे.
0 टिप्पण्या