"कॅन्सर किस खेत की मुली "

गीताच्या घरी आनंदोत्सव चालू होता. कारणही तसेच होते.गीताला विश्वासशी लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी येणाऱ्या नव्या छोटया पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. तिच्यावर वांझ म्हणून पडणारा ठपका आता मिटणार होता. गीताला वांझ म्हणून हिणवणारे नातेवाईक आता त्यांची फिल्म जळाल्याने नाक मुरडून जात होते.

गीता आता स्वतःची दुपटीने काळजी घेत होती.घरातील प्रत्येक जण सतत तिच्या अवती भोवती असायचा. तीला काय हवे काय नको ते बघायचा.तिच्या घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे तीचे सासू, सासरे, दीर, जाऊ, नणंद  तिच्याशी नेहमीच प्रेमाने वागत असत आणि गीता देखील सगळ्यांशी खूप मिळून मिसळून वागत असे. त्यामुळे घरात सून म्हणून आलेली गीता त्या घरची लवकरच मुलगी झाली होती..

गीता दवाखान्यातही अगदी दिलेल्या तारखांवर हजर राहत असे. असे करत तीचे नऊ महीने संपले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.मुलगा खूपच गोड होता. त्याचे खूप कोडकौतुक झाले..त्याचे नामकरण झाले... "प्रथमेश " कारण गीताच्या अष्टविनायक दर्शनानंतर त्याची चाहूल लागली होती.

गीता आता प्रथमेश च्या संगोपनात व्यस्त झाली होती. त्याची प्रत्येक हालचाल जमेल तशी तिच्या मोबाईल फोन च्या कॅमेऱ्या मध्ये टिपून घेत होती.दिवसामागून दिवस जात होते प्रथमेश आता शाळेत जायला लागला होता.अगदीच शाळेच्या पहिल्या दिवशी गीताने शाळेत सोडल्यावर त्याने असा भोंगा पसरला की गीताच्या हृदयात एकदम चर्र झालं.एकवेळ त्याला घरी परत घेऊन जावं असंही तिला वाटलं... पण आईच ती... मन घट्ट करून तिथून निघून गेली...

हळूहळू प्रथमेश आता शाळेत रुळत होता..

प्रथमेश आता पाच वर्षाचा झाला होता... एक दिवस अचानक गीताला आपल्या छातीत स्तनांच्या जागी एक गाठ असल्याचे जाणवले... तिने कुठे तरी स्तनगाठ विषयी वाचले होते म्हणून लागलीच वेळ न दवडता तज्ञ् डॉक्टरला दाखवले..

विविध तपासण्या झाल्या आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तिला कॅन्सर झाल्याचे समजले. हे समजताच गीता तर एकदम कोलमडून पडली.आता आपल्यानंतर घरच्यांचं आणि प्रथमेशचं काय होणार याची तिला खूप चिंता लागली.. तिला खूप रडू येत होतं पण तिने कसं बसं स्वतःला सावरलं.

या बातमीने गीताच्या घरी जणू दुःखाचा डोंगर कोसळला.. विश्वासचे तर हातपाय गळाले होते.आता आपलं आणि प्रथमेश चं काय होणार याची चिंता त्याला सतावत होती.

घरी आल्यावर गीता नेहमीसारखी नव्हतीच... कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती... तिच्यातील हा बदल इवल्याश्या प्रथमेश ने देखील ओळखला होता... इवलुसे मन त्याचे त्याला वाटले आपली आई आई आजारी आहे तिला दुखत असेल म्हणून ती उदास असेल..

गीता असंच उदास बसली असताना प्रथमेश तिच्या जवळ आला.. आणि म्हणाला आई अजूनही बरं वाटत नाही का तूला?? त्याचं ते बोलणं ऐकून गीताला एकदम गलबलून आलं.. प्रथमेशला जवळ घेऊन तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. प्रथमेशने त्याच्या इवल्याश्या हाताने गीताचे डोळे पुसले.. आणि म्हणाला तू लवकर बरी होशील सगळं छान होईल...

प्रथमेश च्या त्या इवल्याश्या हाताच्या स्पर्शाने जनु गीताला एक नवीन हुरूप आला.. तिने दुःखाचं दाटलेलं मळभ झटकलं आणि स्वतःला म्हणाली उठ गीता तूला जगावेच लागेल.. असं रडून चालणार नाही..

आणि गीता लागलीच विश्वासला घेऊन डॉक्टरकडे गेली... डाक्टर नी तिला औषधोपचार करण्यासाठी आणि ऑपेरेशन करून गाठ काढण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की बरं झालं तूम्ही कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेज मध्ये आला आहात.. स्तनाच्या कॅन्सर मधले रुग्ण अगदीच सुरुवातीला आले आणि योग्य त्या औषध उपचाराने लवकरच बरे होतात आणि भरपूर आयुष्य जगतात...

आता गीता खूप खूष झाली.. आणि वेळोवेळी औषध उपचार घ्यायला लागली.. असं तब्बल तीन वर्ष चाललं.. आता कॅन्सर विषयीची तिची भीती पळून गेली होती..

पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.. तिला पुन्हा तपासणी मध्ये फुफुसांचा कॅन्सर झाल्याचे कळाले पण या वेळेस गीता डगमगली नाही.. या वेळेस तिने स्वतःलाच थोपटले आणि म्हणाली.. गीता तूला जगावेच लागेल....

प्रत्येक वेळेस ती त्याच जोमाने औषध उपचार घेते आणि नव्याने उभी राहते... पुन्हा दोन वर्षांनी तिला जठर चा कॅन्सर झाला... पण आता गीताने जणू" कॅन्सर किस खेत की मूली "म्हणत त्यावर मात केली...

आणि आजही ती अशीच औषध उपचार घेते आणि नव्या जोमाने उभी राहते.... तिच्या घरच्यांसाठी आणि प्रथमेश साठी...

तात्पर्य: मनातील निश्चयापुढे नशीब देखील झुकते.

सत्य घटनेवर आधारीत

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

©®Swanubhavsaptarang


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या