आजकाल रोज बागेत फिरणे होत होते.
कळत न कळत मला अगदीच लहान मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या मैत्रिणी झाल्या होत्या.
बागेत सगळ्या कशा मनसोक्त बागडत असत.
कुणी शरीराने तर कुणी मनाने बागडत असत. सुखदुःख वाटून घेतले जात असत.
ती बाग जणू सगळ्यांच्या मैत्रीची साक्षीदार होती.
माझा स्वभाव मोकळा असल्याकारणाने अगदी लहान मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या लता काकू देखील माझ्यासोबत मनसोक्त गप्पा मारत असत. कधी कधी तर माझ्याजवळ त्यांचे मन मोकळे करत असत.
मला देखील त्यांना चलता फिरता आपल्याकडून समुपदेशन होते ना याचे एक समाधान लाभत असे.
मी डॉक्टर असल्या कारणाने त्यांची छोटी ना छोटी शारीरिक तक्रार आणि त्या मागची भीती माझ्यासमोर व्यक्त करत असत.
मला लक्षात येत असे की बऱ्याचदा त्यांची भीती ही शारीरिक न राहता मानसिक असे. मग माझ्याशी बोलल्यानंतर त्यांची ती व्याधी पुन्हा डोकं वर काढत नसे
आता तर जणू आम्ही मैत्रिणीच झालो होतो..
हळूहळू लता काकू त्यांचे खाजगी आयुष्य देखील माझ्यासोबत share करू लागल्या होत्या.
एक दिवस बागेमध्ये काकू खूप उदास बसल्या होत्या... अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू🥺 होते.
मला पाहताच त्यांचे अश्रू अजून अनावर झाले. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले मग काकू मला म्हणाल्या आता नाही सहन होत.... मी खूप केलं सगळ्यांचे... पण घरच्यांच्या माझ्याकडून अपेक्षाच संपत नाहीत....
मी :काय झाले काकू !!🤔पण ईतकं दुःखी होण्याचे कारण काय??
लता काकू : तूला मी अगदीच सुरुवातीपासून सांगते.मी कॉलेज मध्ये असताना माझं एका मुलावर खूप प्रेम होतं. आम्ही आणाभाका घेतल्या.....
पण नंतर आमचे बिनसले....
तुमच्या भाषेत ते काय म्हणतात ब्रेक अप झालं...
मी खूप उदास राहायला लागले. तसंही तो मुलगा माझ्या आईवडिलांना पसंत नव्हता. मग लागलीच त्यांनी वरसंशोधन सुरु केले.
त्यांनी तूझ्या काकांना शोधलं....
तूझे काका मला बघायला आले तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझा काही भूतकाळ आहे.
मी पुढे सांगणार की तूझ्या काकांनी मला थांबवले आणि म्हणाले भूतकाळ तो भूतकाळ असतो. मला त्याच्याशी काहीच देणे घेणे नाही. आजपासून आपण एका नवीन आयुष्याला सुरवात करायची...
मग आमचे लग्न झाले. मी मात्र जणू तूझ्या काकाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले गेले.
वेळोवेळी मला अपराधी पणाची भावना वाटत असल्यामुळे मी दिवसरात्र काम करत असे.
सगळ्यांच्या पुढेमागे करत असे. मग ती सासरची मंडळी असो की तूझ्या काकांचे मित्र मंडळ. फक्त ऐकून घेण्याचे काम मी केले. कधीच कुठलीही तक्रार नाही केली.
पण त्याचा परिणाम असा झाला की आता सगळे मला गृहीत धरू लागले. सुरुवातीला मी तेही केले पण आता या वयात होत नाही गं.... पण कुणी माझा विचारच करत नाही....
प्रत्येक वेळेस मला वाटते की मी प्रेम करण्याचे पाप केले म्हणून कदाचीत मला त्याची शिक्षा मिळत असेल.....
मी हे सगळं ऐकल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की काकूने स्वतःला उगाचच अपराधी ठरवलं आहे.
मग मी काकूंना म्हणाले....
काकू मला सांगा जेव्हा तूम्ही त्या मुलावर प्रेम केले तेव्हा तुम्हाला थोडीच माहिती होतं की तुमचं काकांसोबत लग्न होणार आहे. तेव्हाही तुमच्या भावना खऱ्या असतील ना. कुणाला फसवण्याचा हेतू त्यात नसणार.... मग पाप कसले....
बरं असंही नाही की तूम्ही काकांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही.... तूम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला....मग अपराधीपणाची भावना का?? आणि तूम्ही सगळ्यांना तूमची सवय लावली आता ती मोडायला अवघड जाणारच... पण अशक्य नक्कीच नाही.
पण काही केल्या काकूंच्या मनातील अपराधी पणाची भावना जाईना....
सख्यानो आता तूम्ही तरी लता काकूंना सांगा की त्या अपराधी नाहीयेत.... कदाचित तुमच्या विचारांमुळे त्यांची अपराधीपणाची भावना नाहीशी होईल... अपराधी पणाचे ओझे कमी होईल हो ना.
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या