©® डॉ सुजाता कुटे
आजकाल बऱ्याचश्या वाईट साईट बातम्या कानावर पडत आहेत. जणू काही वाईट बातम्यांचे सत्रच चालू आहे.
पण त्यात सगळ्यात जास्त क्लेशदायक गोष्ट म्हणजे खूप चांगले अधिकारी, नावाजलेल्या व्यक्ती, हुशार विद्यार्थी, हुशार अधिकारी, अगदीच मोठमोठया पदावर असणारे तरुण अधिकारी,असे सगळे डिप्रेशनला बळी पडत आहेत.आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
त्यांना वाटतं की आत्महत्या केली की आपण कायमस्वरूपी त्यातून मुक्त होणार.
पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अश्या टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती, नातेवाईक मित्रपरिवार हे देखील जिवंतपणी मरणयातना भोगतात.
खरंच कुणी विचार केला आहे का?? हे असं का होत असावं 🤔
जर पिढीप्रमाणे विचार केला तर असे टोकाचे पाऊल उचलण्याची संख्या ही नवीन पिढी मध्ये जास्त आहे.
जुन्या पिढीत कमी.
का बरं असं होत असावं.🤔जुन्या पिढीपेक्षा नवीन पिढीला जे मागितलं ते वेळेवर मिळतं. त्यांच्याकडे तर ज्ञानाचे भांडार आहे. आधुनिक युगात फक्त प्रश्न पडायला वेळ आहे की लागलीच गुगल रुपी ज्ञान त्यांना मिळते. चौकस बुद्धीमत्तेला हवा तो खजिना मिळतो. मग तरी देखील असले पाऊल??
माझ्या मते ज्या प्रमाणे आधुनिक युगात लोकांमध्ये ज्ञानाची भर पडत आहे त्याच प्रमाणात लोकांची मनं मात्र कमजोर होत चालले आहेत.पण हे असं का? कुठे चुकत आहे??
मुलांचं पालन पोषण करताना आपली चूक होत आहे का? तसं पहायला गेलं तर आज कालचे पालक.. पालक कमी आणि मित्र मैत्रिणी बनून मुलांचं पालन पोषण करत आहेत. मग तरीही डिप्रेशनचे प्रमाण वाढलेलेच...
सहन शक्ती कमी झालेली आहे. पण मग का ही सहन शक्ती कमी झाली आहे?
यावर गहन विचार व्हायला हवा...हो ना....
©® डॉ. सुजाता कुटे
माझ्या मते पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपण जेव्हा आपल्या पाल्याला घडवत असतो तेव्हा आपल्याला हवे तेव्हा काही मिळाले नाही म्हणून आपल्या पाल्याला ते सर्व उपलब्ध करून देत असतो.
कधी कधी वेळेच्या आधी आणि कधी कधी गरज नसतानाही त्यांना जास्तीत जास्त चांगलं मिळावं यावर आपला भर असतो.
त्यांच्या शारीरिक आरोग्याची देखील आपण भरपूर काळजी घेतो. पण या सर्वांमध्ये त्यांचे मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास विसरून जातो.
आता तुम्ही म्हणाल छे छे... उलट आम्ही आमच्या पाल्याची मानसिकता देखील जपली आहे. त्यांना गरज पडेल त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्यासाठी खंबीर उभे राहिलो आहे.
पण मला सांगा समाजात वावरताना प्रत्येक वेळेस आपण तर त्यांच्यासाठी उभे राहू शकत नाही ना. लहानपणापासून आपण आपल्या पाल्याला किती वेळा अपयश पचवायला शिकवले आहे??किती नकारात्मक गोष्टींचा स्वीकार त्यांना करायला लावला आहे?? नाही ना....
म्हणूनच मला तरी वाटते अगदी लहानपणापासूनच पालकांनी आपल्या पाल्याला छोटे छोटे अपयश पचवायला शिकवले पाहीजे. आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात हे देखील त्यांना समजले पाहिजे.
मला तर वाटतं आता काळाची गरज आहे की शाळेमध्ये अभ्यास, खेळ आणि कलेव्यतिरिक्त ध्यानसाधनेचा किंवा मनाचे आरोग्य कसे राखता येईल याचा शिकवणीचा एखादा तास झाला पाहीजे.
तुम्हाला काय वाटतं??
©® डॉ सुजाता कुटे
लेख आवडल्यास like आणि कॉमेंट करा. Share करायचा असल्यास नावासहित share करण्यास माझी काहीच हरकत नाही.
Follow करण्यासाठी माझ्या #swanubhavsaptarang फेसबुक page ला like करा.
0 टिप्पण्या