शेजारी एक नवीन जोडपं राहायला आलं होतं.पाहताच क्षणी ते अगदी सुखवस्तू कुटुंब आहे असं जाणवत होतं. त्या दोघांचंही बोलणं अगदी लाघवी त्यांच्या हालचाली अगदीच सुसंस्कृत घराण्याला शोभेल अश्या दिसत होत्या. जोडप्यातील मुलीचे नाव अपूर्वा तर मुलाचे नाव निमिष होते.
सोसायटी मध्ये सर्वांनाच नवीन जोडप्याबद्दल कुतूहल होते.नवीन लग्न झाले असेल म्हणून हे ईतके आनंदी रहात असतील.. असं कसं यांच्या घरातून कुरबुरीचा आवाज कधीच येत नाही... असा प्रश्न त्यांच्या शेजाऱ्यांना येत होता....
अपूर्वा आणि निमिष ने एक सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि शेजाऱ्यांना आता त्यांच्या बद्दल जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली...
शेजारच्या विमल काकू तर खूपच उत्सुक होत्या... त्यातल्या त्यात आज त्यांना नवीन जोडप्यासहीत त्यांच्या समवयस्क बाई दिसली... त्यांच्या वागण्या बोलण्यावरून त्या निमिषची आई असतील असा अंदाज बांधता येत होता...
सत्यनारायणाच्या पूजेची वेळ झाली...अपूर्वा आणि निमिष च्या घरी एक एक पाहुण्यांचे आगमन होत होते...
अपूर्वा आणि निमिषने त्यांचे छोटेखानी घर अतिशय सुंदर रित्या सजवलेले होते.
सत्यनारायणाची पूजा देखील खूप व्यवस्थित मांडलेली होती...
विमल काकू सर्व सजावट बघुन भारावून गेल्या.त्यांची ओळख निमिषच्या आईसोबत झाली...
एकंदर सर्व मजेत, शांतपणे, नीटनेटके पणाने सर्व चालले होते ते पाहून विमल काकू अधिकच भारावून गेल्या....
बाकी शेजारी सुद्धा असेच इंप्रेस झालेले होते.त्या मुळे सगळीकडे उदाहरणसहित अपूर्वा आणि निमिषच्याच कुटुंबाची चर्चा चालू होती....
दुसरा दिवस उजाडला...
आज मात्र विमल काकूला वेगळेच चित्र पहायला मिळाले....
सकाळी सकाळी निमिष ची आई अंगण झाडताना दिसली...
थोडया वेळाने निमिष ची आई आपल्या सुनेच्या हातात डब्बा देताना दिसली.... आणि नंतर भांडे देखील घासताना दिसली...
ओ... असं आहे तर.... सगळी कामं निमिष ची आई करते आणि सुन मात्र आयता डब्बा घेऊन जाते... तरीच म्हटलं हे लोकं ईतके आनंदी कसे काय... यांना फुकटचा नौकर मिळाला ना... हं काय तर म्हणे सुखी आणि आनंदी कुटुंब... ज्या व्यक्तीला आईची कदर नाही... ती व्यक्ती काय कामाची... जसं विमल काकूच्या नजरेतून काही सुटलं नाही तसंच आजूबाजूच्या
व्यक्तीच्या नजरेतून देखील काही सुटलं नाही....
सगळीकडे अपूर्वा आणि निमिष किती स्वार्थी... निमिष बायकोचच ऐकत असावा म्हणूनच आता निमिषची आईच हे असले सगळे काम करत आहे... अशी चर्चा शेजार्यांमध्ये सुरु झाली...
विमल काकू तर अगदी प्रत्येक शेजाऱ्याकडे जाऊन निमिषची आई काम करताना सगळ्यांना निदर्शनास आणून द्यायला लागल्या होत्या...
एक दिवस विमल काकू ला अपूर्वा ट्रॅव्हल बॅग घेऊन जाताना दिसली.. आणि नंतर निमिष आणि त्याची आई घरी होते... त्या दोघांना बघुन मात्र आता विमल काकू जास्तच चिंतीत झाल्या होत्या...
काय बाई आजकाल ची पिढी सासू वर सगळं काम सोपावून सुन बिनधास्त गावाला जाते...हे असं पाहून आमच्या सुना देखील बिघडतील... आमच्याशी देखील असं वागतील....ते काही नाही आज मी निमिष च्या आईशी बोलतेच....
निमिष ऑफिसला निघून गेल्यानंतर विमल काकू साखरेच्या बहाण्याने निमिषच्या आईला भेटायला गेल्या...
विमल काकू : जरा येऊ का आत?
निमिषची आई : अरे विमल ताई!!तुम्ही... या ना...
विमल काकू : तुमच्या सुनबाई दिसत नाहीत.... परवा बॅग घेऊन जाताना दिसल्या...
निमिषची आई : अपूर्वा होय... ती ट्रेनिंग साठी गेली आहे...
विमल काकू : पण तुम्हाला असं सोडून?? मला तर तुमच्या घरातली सगळी कामे तुम्हीच करताना दिसतात... एखादी कामवाली मावशी तरी लावायची ना?
निमिषची आई विमल काकूचे ते वाक्य ऐकताच हसायला लागल्या...
विमल काकू मात्र निमिषच्या आईचे हसणे पाहून गोंधळून गेल्या...
विमल काकू : काय झालं?? मी काही विक्षिप्त बोलले का? ते काय आहे ना तुमच्या घरचं वातावरण बघुन उद्या आमच्या सुना पण अपूर्वा सारखं वागतील.
निमिषच्या आई : विमल ताई!!तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे... माझी सुन अपूर्वा खूप समजूतदार आहे.. ती माझी खूप काळजी घेते.
विमल काकू : काळजी घेते??ताई पण मला तर तुम्हीच सगळी कामं करताना दिसता.
निमिषची आई : विमलताई!!मला तुमचा मुद्दा पटत नाही असं नाही... पण तुम्ही जर थोडा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला तर तुम्हालाही लक्षात येईल...
विमल ताई : म्हणजे??
निमिषची आई : सत्यनारायणाच्या दिवशी आपण भेटलो तेव्हा तुम्ही मला सांगत होत्या की तुम्ही तुमच्या अंगदुखी मुळे डॉक्टर कडे जाऊन आल्या आणि डॉक्टरने तुम्हाला काही व्यायाम सांगितले आहेत... आणि तुम्हाला घरी उठबस करणे देखील अवघड झाले आहे...
विमल ताई : हो..
निमिषची आई : विमलताई मी हे जे कामं करते ना ते सगळे माझ्या स्वेच्छेने करते... मी शक्यतोवर अश्या प्रकारची कामे निवडली आहेत की ज्या कामानिमित्त माझ्या शरीराचा योग्य प्रकारे व्यायाम होतो... असं नाही की आमच्याकडे कामाला बाई नाही. ती आहे... तिचं ती काम करते... आणि माझं मी... तुम्हाला सांगते विमलताई आपण जर एका ठिकाणी बसलो ना कळत नकळत आपल्या शरीराला गंज चढतो... ईतकंच नाही आपल्या शरीराचा जो भाग काम करणार नाही तो अधू होणार हा निसर्गनियम आहे. मग सांगा की यात जर माझा फायदा असेल तर मी कश्याला दुसऱ्यांकडे बघू.
हे झालं कथानक... पण आज मी जिथे ड्युटी करते तिथे एक 94 वर्षांच्या आजी नियमित ब्लड pressure तपासण्यासाठी माझ्याकडे येतात अर्थातच त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत असतो.. तो मुलगा आईच्या काळजीपोटी त्यांची तक्रार करत होता की आई सकाळी चार वाजता उठते आणि आमच्या क्वार्टरची पूर्ण बिल्डिंग झाडते.. कितीही समजावलं तरी ऐकत नाही.
म्हणूनच तर आजींना BP चा देखील आजार नाही... उलट त्या करत आहेत ते त्यांना नियमित करू द्या... त्यातून त्यांना आनंद तर मिळतोच पण शारीरिक दृष्टया आजही त्या तंदुरुस्त आहेत... असं मी त्यांना सांगितलं... तुम्हाला देखील पटतंय ना...
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
0 टिप्पण्या