गायत्री : काय? काय म्हणालात सर तुम्ही... देवेनचा मारेकरी?? तो तर अपघातात गेला ना..
कमांडो : अपघात झाला नव्हता तो घातपात होता असा माझा कयास आहे... म्हणूनच तर मी डायरी मागत आहे... कारण आमच्या कडे अशी माहिती आली आहे की डागाच्या सहकाऱ्याबाबत काहीतरी महत्वाची माहिती तुझ्या नवऱ्याला कळाली होती... पण ते नेमकं काय... आम्हाला नाही माहिती...
गायत्री : ठीक आहे सर... मी उद्या तुम्हाला ही डायरी आणून देते...
दरम्यान अन्विताला तिच्या आईने मिस्टर ब्लॅक बद्दल सगळं काही सांगितलं... एकामागून एक होणारे आघात अन्विताला एकदम बधिर करून जात होते..तिच्या डोळ्यातून नुसते घळाघळा अश्रू वाहत होते... तिची आई तिला जे सांगत होती ते तिला पडलेले एक वाईट स्वप्नच आहे असं तिला वाटत होतं....
आपले आईबाबा आपले नाहीत... कसं शक्य आहे... दोघांनीही किती लाड केले माझे... मला कधीच अंतर दिले नाही... देव आणि माझ्यात कधीच फरक केला नाही.. मला आणि देवला कधी पण समान वागणूक मिळाली... समान कसली उलट कुठलीही गोष्ट मला आधी मिळाली... मी कसं मानु की मी तुमची मुलगी नाहीये...
विचार करून अन्विता ओक्साबोक्सि रडायला लागली..
जानकी : अगं वेडे... कशाला रडत आहेस... तुझ्या या भूतकाळाने तुझा वर्तमान काळ काय बदलणार आहे का? अन का गं... तुला दोन दोन आईबाबा असू शकत नाही का?
अन्विता : हं...
जानकी : हं काय हं.. चल तोंड धुऊन घे... फ्रेश हो...तुझ्या बाबांचा फोन आला होता ते म्हणत होते की...आपल्याला आता आपल्या घरी जायचं आहे..
अन हे जे मिस्टर ब्लॅक चं प्रकरण आहे ते फक्त तुझ्या माहिती साठी आहे....
कारण आता जर तुमची भेट झाली तर एक बाप म्हणून तो रिऍक्ट होईलच...त्याने तुझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता म्हणून आता त्याला त्याचा पश्चाताप होत असेल... तर बेटा भेट झाल्यावर त्याला हिडीस फिडीस करू नको...प्रेमाने बोलशील..
अन्विता : हं...
गायत्री तिच्या घरी गेली... वर्षभरात आपण कधी देवेन ची डायरी उघडून बघितली नाही... पण त्या डायरीत असं काय विशेष होतं? काहीच तर नव्हतं... फक्त तो माझ्यावर कविता करायचा इतकंच...
गायत्रीने विचार करत करत तिच्या रूम मधला कधीचा बंद असलेला संदूक उघडला... संदकाच्या उजव्या कोपऱ्यात असलेली डायरी तिने हातात घेतली आणि वाचायला लागली...
अहाहा काय ते अप्रतिम सौंदर्य?
मनस्वी भावना अश्या उत्कट का जाहल्या
स्पंदनास माझ्या तुझ्या चक्षुने खेळ केला
डायरी उघडताच गायत्रीचे डोळे भरून आले... अन फुर्र फुर्र करत ती डायरीचे एक एक पान उलटत होती...
तुझ्या पेक्षाही तुझी डायरी तुझे माझ्यावर किती प्रेम होते हे सांगते... का देवेन का तू मला असा सोडून गेलास... सांग ना...
डायरी तर शेवटपर्यंत वाचली पण ह्याच्यात माझ्या देवेन वर काही घात होईल असं काही सापडलं नाही...
कदाचित कमांडोच्या नजरेने काही सापडेल... विशेष म्हणजे त्यांना ह्या डायरी बद्दल माहिती होतं... ते कसं काय? का ते आपल्याला असंच म्हणाले असतील? पण त्यात त्यांचा काय फायदा? हं... कदाचित ते म्हणत असतील तेच खरं असेल...
चला उद्या सकाळी पहिलं हे काम करू आपली डायरी कमांडोला देऊन टाकू...
ही डायरी बघून,बघुयात काय निष्कर्ष काढतात ते....
झुक्या त्याच्या घरी गेला... आणि परत जाण्याची तयारी करायला लागला..त्याने त्याचे कपडे आणि लॅपटॉप सोबत घेतले...झुक्याची ती तयारी पाहून त्याचे आईवडील मात्र चिंतीत पडले...
जाऊन राहण्याची गरज आहेच का रे मोहित
? तू कुठे खाणार पिणार, कुठे झोपणार? आणि खरं सांगू का तू कशाला अश्या भानगडीत पडतोस? तो डागा का कोण आहे तो त्याला जर कळालं की तू सायबर चे काही काम करत आहेस तर तो तुला जिवंत सोडायचा नाही...आपलं साधं सरळ कॉलेज करायचं तर.....झुक्याची आई म्हणायला लागली
झुक्या : तुझी काळजी कळते मला आई!!पण खरं सांग जेव्हा मी आपल्या शहरावर आलेल्या संकटाला मात करण्यासाठी काहीतरी करतोय ह्याचा तुम्हाला अभिमान वाटत नाही का? माझे जे बाकीचे मित्र करू शकत नाही.. मी काहीतरी वेगळं करू शकतो म्हणूनच ते माझी मदत घेत आहेत ना...
झुक्याचे ते शब्द ऐकून त्याचे आईबाबा निरुत्तर झाले...
सूर्या आणि प्रदीप मात्र प्रकाशच्या मदतीने आणि त्यांचे स्वतःचे ड्रॅग्जचे सोर्सेस आणि प्रकाशचे सोर्सेस सध्या कुठे आणि काय करत आहेत याची माहिती घेत होते...
अन्विता आणि तिची आई दोघीही घरी आल्या... घरी आल्यावर अन्विता दिवाकर कडे पळत पळत गेली..आणि म्हणाली बाबा!!बघा ना ही आई काय म्हणतेय...
दिवाकर :अन्विता बेटा!!अगं फक्त जन्म दिला नाही म्हणजे आम्ही काही परके होत नाही.. आम्ही तुझेच आईबाबा उलट तू स्वतःला नशीबवान समज की तुला दोन दोन बाबा आहेत...
अन्विता!!मला माहिती आहे मी तुझ्या बाबतीत चुकलो.. पण तुझ्या सुप्रिया आईची शप्पथ घेऊन सांगतो की जे काही घडलं ते सगळं गैरसमजातून घडलं...मला माहिती आहे तू मला कदापि माफ करणार नाहीस.. माझी तशी अपेक्षाही नाही...तरी देखील मी तुझी माफी मागतो बेटा...
कमांडोने बेलाला देखील तिच्या घराजवळ असणाऱ्या गल्लीत जुगार चालतो तिथे तीन माणसे नेहमी जुगार खेळत बसतात... त्यांच्यावर लक्ष द्यायचं... आणि जेव्हा त्या गल्लीत आठ ते दहा लोकं जुगार खेळायला जमतील की लागलीच मला कळवायचं असं सांगितलं होतं... त्या मुळे येता जाता बेलाची नजर त्या गल्लीकडे राहू लागली...
मिस्टर ब्लॅक ने भाल्या टिड्या आणि दाम्याला अपहरण करणाऱ्या टोळीची माहिती काढायला सांगितली...
अपहरण झालेला देव डागाच्या माणसांच्या तावडीत होता.. देवच्या डोळयांवर पट्टी बांधलेली होती...एका खोलीत गेल्यावर देवच्या डोळ्यांवरची पट्टी सोडली गेली... त्या खोलीत धुसर असा प्रकाश होता... अपहरण करणाऱ्या माणसांना देव इतका शांत कसाकाय? त्याने पूर्ण रस्ताभर चुकूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही याचं आश्चर्य वाटत होतं...
खोलीत गेल्यावर तिथे खुर्चीवर एक माणूस बसलेला होता... कदाचित त्यांचा मुख्य माणूस असेल..
असा अंदाज देव ने त्याला बघून काढला होता...
डागा तर नक्कीच नव्हता कारण डागाचा फोटो आपल्या बाबांनी आपल्याला पाठवलेला होता...
हं आणलं का त्या शास्त्रज्ञ की कोण काय आहे त्याच्या पोराला...
काय रे पोरा तू पन बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालतो आहेस म्हणे...
देव : सर... बाबांच्या पाऊलावर पाऊल... मी त्यांच्या हातांच्या नखाइतकं देखील काम केलेलं नाहीये.... अजून मी नवखाच आहे सर..पण सर तुम्ही मला इथे असं अपराध्यासारखं का पकडून आणलं आहे... म्हणजे तुम्हाला त्याचा असा काय फायदा होणार आहे?
हे तू नको ठरवूस समजलं ना... मी काय केलं का केलं आणि काय करायचं नाही ते... एकदम लालबुंद होऊन तो मुख्य माणूस म्हणाला..
वातावरण बघून देव शांत बसला...
देव फक्त नी फक्त तिथल्या वातावरणाचा अभ्यास करत होता.. त्याचे दोन्हीही हात मागे एका दोरीने बांधलेले होते... त्याच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी आणि दिवाकरला मानसिक त्रास देण्यासाठी डागाच्या माणसांनी देव चे अपहरण केले होते.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
खूप छान 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा